
छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणे किंवा पाणीपुरवठा खंडित होणे हे काही नवीन नाही. पण यावेळी पाणीपुरवठा खंडित होण्यामागे जरा वेगळंच कारण आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल, पण एका उंदराने छत्रपती संभाजी नगर शहरातील पाणीपुरवठा तब्बल नऊ तास बंद पाडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्याचं झालं असे की, फारोळा जलशुद्धी केंद्रातील पंपगृहात एका उंदरामुळे स्पार्क झाला. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी 1200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद पडला. विशेष म्हणजे हा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी तब्बल नऊ लागेले.
छत्रपती संभाजीनगर शहराला 700 आणि 1200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनींनी पाणीपुरवठा केला जातो. मात्र या दोन्ही जलवाहिन्या कालबाह्य झाल्याने सतत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो. त्यात वादळी वारा आणि पावसामुळे हे प्रमाण अधिकच वाढतात. शुक्रवारी पहाटे सुद्धा असाच काही प्रकार घडला.
( नक्की वाचा : Ghatkopar station : घाटकोपर स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी लोकलखाली अडकला )
फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपगृहातून पुढे होणारा 1200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद झाला. कारण होते वीजपुरवठा अचानक बंद पडल्याचे. त्यामुळे जलशुद्धी केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. वीज पुरवठा कसा बंद पडला याचा शोध सुरू झाला. यावेळी पंपगृहात एका उंदरामुळे स्पार्क झाल्याचे लक्षात आले.
दुरुस्तीसाठी लागले तब्बल नऊ तास...
एका उंदरामुळे स्पार्क होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याचे लक्षात येताच महानगरपालिका प्रशासन कामाला लागलं. जलशुद्धी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पण या दुरुस्तीसाठी आणि शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी तब्बल नऊ तास लागले. त्यामुळे सहाजिक शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पण जेवढी चर्चा पाणीपुरवठा खंडित होण्याची झाली नाही, तेवढी चर्चा त्याला कारण ठरलेल्या उंदराची झाली हे मात्र नक्की.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world