मुंबई आणि उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरात अचानक वातावरण बदललं. धुळीचं वादळ आणि जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही भागात गारांचा पाऊस देखील झाला आहे.
कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ परिसरात जोरदार वादळ आणि पाऊस आल्याने नागरिकांची एकच पळापळ झाली. डोंबिवली आणि कल्याणमध्ये संपूर्ण धुळीचे वातावरण झालं. बदलापूरमध्ये तशीच स्थिती पाहायला मिळत आहे. दुपारपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होतं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यामुळे खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मुंबई आजूबाजूच्या परिसरातही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
पालघरमध्ये गारांचा पाऊस
पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची पळापळ झाली. मनोर, विक्रामगड जव्हार परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
(नक्की वाचा: राज्यात अनेक जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचं, फळबागांचं नुकसान)उन्हाच्या झळांनी त्रस्त नागरिकांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. जव्हारच्या नेहाळा - नांदगाव रस्त्यावर झाडे आणि विजेचे खांब पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. तर उन्हाळी भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.