सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
शेतीच्या लागवडीसाठी शेतकरी हजारो रूपये खर्च करून दिवस-रात्र एक करतो. याचा परतावा चांगला मिळावा अशी सर्वसाधरणपणे त्यांची इच्छा असते. मात्र पिकाला हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतीवर गुजराण करणं दिवसेंदिवस अवघड जात आहे. सोलापूरातून अशीच एक घटना समोर आली आहे. या शेतकऱ्याने सोनं गहाण ठेवून कांद्याचं पिक काढलं होतं, मात्र प्रत्यक्षात जेव्हा कांदे विकायला बाजारात घेऊन गेला तेव्हा त्याच्या हातात केवळ 557 रुपये आल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाला आहे. हा शेतकरी 24 पोते कांदा विक्रीसाठी शेतात घेऊन गेला, यानंतर त्याला जो काही परतावा मिळाला तो अनेकांना धक्का देणारा आहे. दररोज दिवस-रात्र शेतीची मशागत केली आणि खत, पाण्यासाठी हजारो रूपये खर्च करूनही केवळ 557 रुपये हाती पडले आहेत.
नक्की वाचा - 1 जूनपासून पशुधनासही आधारकार्ड; अन्यथा सुविधांपासून राहावं लागेल वंचित
मारुती उमाकांत खांडेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. कांदे लागवडीसाठी या शेतकऱ्याने 58 हजारांचा खर्च केला, मात्र या मोलाचे कष्ट मातीमोल झाल्याने शेतकरी संतप्त झाला होता. 2866 एकूण कांद्याची पट्टी, हमाली, तोलाई , वाहन खर्च वगळून फक्त 557 रुपये हातात पडल्याने शेतकऱ्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. घरातील सोनं गहाण ठेवून या शेतकऱ्याने शेती केली होती. मात्र हजारो रूपये खर्च करूनही केवळ 557 रुपये हाती आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world