Rain Alert : राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. तर राज्यात विविध भागात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यात आज देखील पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 14 ते 18 मे दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह वीज आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे, वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट?
हवमान विभागाने आज 15 मे रोजी अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर,, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे , पुणे घाट , सातारा , सातारा घाटला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आहिल्यानगर , नाशिक जिल्ह्याला देखील जोरदार पावसासह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- BMC Election : नवं राजकीय समीकरण! मनसे-शिवसेना युतीबाबत हालचालींना वेग, पडद्यामागे काय घडतंय? )
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना या काळात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडं पडणे, विजेचे खांब कोसळून नुकसान होणे आणि वीज प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.