
देवा राखुंडे, बारामती: महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. या निकालात अनेकांनी दैदीप्यमान यश मिळवले. दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे एकीकडे कौतुक सुरु असतानाच बारामतीमध्ये मात्र दहावीत प्रथम आलेल्या मुलीच्या पालकांना अश्रु अनावर झाले. कारण परिक्षेत डोळे दिपवणारे यश मिळवलेल्या त्यांच्या लेकीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. मंगळवारी तिचा निकाल हातात आल्यानंतर सर्वांनाच दुःख अनावर झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून 8 एप्रिल 2025 रोजी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. काल दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मृत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे. एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते.
याच मुलीने दहावीच्या बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला. अंकिताचा निकाल हातात आल्यानंतर तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. अंकिताला मोठे होऊन डॉक्टर बनायचे होते. मात्र गावगुडांंनी तिचे जगणे असह्य केले, याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. दुर्दैवी बाब म्हणजे अंकिताच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या चार आरोपींपैकी फक्त एकालाच अटक झाली आहे.
(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)
लेकीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी झिजवत आहेत. उर्वरीत आरोपींना अटक व कठोर कारवाई हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल असे तिच्या पालकांनी सांगितले आहे. दरम्यान, नियतीच्या खेळात नापास झालेली अंकिता दहावीच्या परीक्षेत पहिली आल्यानंतर सर्वांनाच अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world