जाहिरात
This Article is From Jun 28, 2024

अर्थसंकल्पातून तुमचे शहर आणि जिल्ह्याला काय मिळालं? वाचा सविस्तर

Maharashtra Budget 2024 : मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता. 127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका  वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार. 

अर्थसंकल्पातून तुमचे शहर आणि जिल्ह्याला काय मिळालं? वाचा सविस्तर

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, महिला, तरुण आणि विविध विकासकामांसाठी मोठ्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. मुंबईतील शिवडी-वरळी जोडरस्त्याचे काम  डिसेंबर 2025 अखेर  पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा देखील अजित पवार यांनी केली. आजच्या अर्थसंकल्पातून राज्यातील विविध शहरांना काय मिळालं यावर एक नजर टाकुयात.    

(नक्की वाचा- राज्यातील महिलांसाठी 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा; दरमाह 1500 रुपये मिळणार)

अर्थसंकल्पात विविध शहरे आणि जिल्ह्यांसाठी मोठ्या घोषणा

  • मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता. 127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका  वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार. 
  • शिवडी-वरळी जोडरस्त्याचे काम  डिसेंबर 2025 अखेर  पूर्ण करण्यात येणार.  
  • ठाणे किनारी मार्गाचे 13.45 किलोमीटर लांबीचे 3 हजार 364 कोटींचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित. 
  • प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे 6 हजार 500 किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारणांचे उद्दीष्ट. 2 हजार 303 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण. 
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 23 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे  3 वर्षात पूर्ण करण्यात येणार. 
  • भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद. 
  • संत सेवालाल महाराज जोडरस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोडरस्ते योजनेची लवकरच  अंमलबजावणी. 
  • 19 महानगरपालिकांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबविण्यात येणार. 
  • ‘ड' वर्ग महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी 615 कोटी  रुपयांची योजना राबवण्यात येणार. 
  • धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या मुंबई, नंदूरबार, नांदेड, वर्धा, अमरावती आणि कोल्हापूर येथील इमारतींच्या बांधकामासाठी तसेच अस्तित्वातील इमारतींच्या नूतनीकरणासाठी 125 कोटी रुपयांचा निधी. 
  • मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 2 हजार 567 ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मान्यता.
  • जागतिक वारसा नामांकनासाठी  शिवकालीन 12 किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला, कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव  याबाबतचे प्रस्तावही पाठवण्यात येणार. 
  • शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करणार.
  • वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प. 
  • सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 381 कोटी 56 लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर.
  • कल्याण-नगर मार्गा माळशेज घाटात सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक व्ह्युईंग गॅलरी उभारण्यात येणार.
  • नागपूर जिल्ह्यातील रामटेक विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात 211 कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार.
  • अध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे स्मारकासाठी पावडदौना, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथे विकास 77 कोटीचा आराखडा तयार करणार. 
  • संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करणार. 
  • कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात येणार.
  • बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे बहुउद्देशिय सभागृह उभारण्याकरीता तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ,बोरगाव-काळे तालुका जिल्हा लातूर या शैक्षणिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार.
  • छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा, जिल्हा सांगली येथे त्यांचे स्मारक उभारणार.
  • संत श्री रुपलाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार.
  • आदिवासी कलांचे प्रदर्शन,वृध्दी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हतगड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे कलादालन स्थापन करण्यात येईल.
  • मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या  305 कोटी रुपये किमतीच्या आराखड्यास मान्यता 
  • जिल्हास्तरावर संस्थात्मक क्षमता वाढवून विकासाला चालना देण्यासाठी ‘महास्ट्राईड' हा 2 हजार 232 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणार.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: