मुंबईकरांना ट्रॅफिकपासून काहीसा दिलासा मेट्रो 3 मुळे मिळाला आहे. मेट्रो 3 प्रकल्पाचा एक टप्पा सुरू झाला आहे. भुयारी मार्गावरून धावणारी ही मुंबईतील पहिली मेट्रो सेवा आहे. शनिवारी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र प्रवाशांसाठी हा मार्ग सोमवारी खुला करण्यात आला. मेट्रो ३ ही सीप्झ आणि कुलाबादरम्यान धावणार आहे. या मार्गावरील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू झाला आहे. मेट्रोमुळे आरे ते बीकेसीचा प्रवास खरोखर आरामदायी आणि वेळ वाचवणारा आहे का? प्रवाशांना काय अडचणी जाणवल्या याबाबत जाणून घेऊया.
अवघ्या 15 मिनिटांमध्ये आरेहून बीकेसीला पोहोचणारा हा सुखकर प्रवास आहे. मुंबईत ट्रॅफिकची समस्या ही गंभीर आहे. वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या मुंबईकरांसाठी हा प्रवास नक्कीच उपयुक्त ठरणारा आहे. मेट्रोचा गारेगार प्रवास सुखावणारा आहे. मात्र या थंडगार प्रवासासाठी प्रवाशांना काही विघ्नांचा अडथळा पार करावा लागत आहे.
या मेट्रोचे तिकीट युपीआयने (UPI) खरेदी करता येत असेल हा तुम्ही विचार करत असाल तर तुमची फसगत होईल. कारण तूर्तास रोख रक्कम देऊनच तुम्हाला तिकीट विकत घेता येत आहे. अॅप आहे मात्र ते फक्त आयफोनवरच उपलब्ध आहे. आणखीही काही समस्या आहेत ज्या प्रवाशांना जाणवत होत्या.
भुयारी मार्ग असल्याने मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो असा अंदाज बांधला जात होता. व्होडाफोन आणि एअरटेलची सेवा असणाऱ्या ग्राहकांना नेटवर्क मिळत होते, मात्र इतरांना नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे या प्रवाशांना फोन करता येत नव्हता किंवा इटरनेट सर्फिंगही करता येत नव्हतं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर मेट्रोमध्ये बसल्यानंतर आणि मेट्रो आरे स्टेशनमधून सुटल्यानंतर सुरु होतो.
पहिल्या स्थानकातील इंडिकेटरही नीट माहिती देत नव्हते असं काही प्रवाशांचं म्हणणं होतं. ही चूक सुधारली नाही तर भविष्यात स्थानकामध्ये मोठा गोंधळ उडू शकतो. पहिला दिवस भाकड दिवस म्हणून या चुकांकडे दुर्लक्ष करता येऊ शकतं. मात्र या सगळ्या चुका दुरुस्त झाल्या तरच प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. मेट्रोच्या तिकिटाचे दर हे परवडणारे आहेत. उकाड्यापासून सुटका करून घ्यायची असेल, वेगाने बीकेसी गाठायचे असेल, ट्रॅफीकच्या समस्येने त्रस्त असाल तर हा मार्ग प्रवाशांसाठी प्रचंड उपयुक्त आहे.