मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला पालकमंत्र्यांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्रिपदाचं वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदातून डावलण्यात आलं आहे. पालकमंत्रिपदासाठी तिन्ही पक्षामध्ये रस्सीखेच पाहायला मिळालं. मात्र पालकमंत्रिपद इतकं महत्त्वाचं का असतं? पालकमंत्र्यांना कोणते अधिकार असतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पालकमंत्र्यांचे अधिकार काय असतात?
मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात त्याचप्रमाणे पालकमंत्री हे त्या जिल्ह्याचे प्रमुख असतात. पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक म्हणून काम पाहतात. पालकमंत्री पदावरील व्यक्तीला जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवता येतं.
राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनातील दुवा
राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात. जिल्ह्याच्या विकासाकडे वैयक्तिक लक्ष देणे, राज्य सरकारद्वारे जिल्ह्याचा जो काही विकास होतो त्यावर पालकमंत्र्यांची बारीक नजर असते आणि त्यासाठी ते जबाबदार असतात.
निधी वितरणाचा महत्वाचा अधिकार
जिल्ह्यातील विविध सरकारी योजना आणि विकासकामांच्या अंमलबजावणीवर देखील पालकमंत्र्यांचं नियंत्रण असतं. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसह स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी काम करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असते. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी वितरित करण्याचा सर्वात महत्त्वाचा अधिकार पालकमंत्र्यांकडे असतो.
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष
जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री अध्यक्ष असतात. त्यामुळे महापालिकास, जिल्हा परिषद यासारख्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होणारा विकास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टीवर पालकमंत्री यांचे नियंत्रण असते. जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा करणे आणि त्यासाठी शासनाकडून पैसा उपलब्ध करून घेणे. आमदार, खासदार यांनी मागणी केलेल्या कामांना मंजुरीचे अधिकारही पालकमंत्र्यांकडे असतात.