Heat Wave in Maharashtra : मुंबई, ठाण्यासह राज्यभर उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात अनेक भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशांपर्यत पोहोचला आहे. उष्णतेच्या लाटे धोका ओळखून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. मार्च महिन्यातच उष्णतेच्या तीव्र छळा जाणवू लागल्याने नागरिकही हैराण झाले आहेत.
पुढच्या 4 ते 5 दिवसात हे तापमान आणखी वाढेल असा अंदाज आयएमडी पुण्याचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ के. ए. होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट दिसत आहे असंही ते म्हणाले. कोकण किनारपट्टीवर ही येत्या काही दिवसात तापमान वाढेल असंही त्यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जास्त तापमान दिसून येतं. कोकणातही तापमान वाढेल असे शास्त्रज्ञ के. ए. होसालिकर यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर ज्या सुचना हवामान विभागाकडून दिल्या जातील त्यासर्वांनी पाळाव्यात असं आवाहन ही त्यांनी केलं आहे.
एखाद्या भागात उच्च तापमानामध्ये आकस्मिकरित्या 4.5 अंश सेल्सीअस पेक्षा वाढ होणे यास उष्मलाट म्हणतात. तर 6.4 अंश सेल्सीअस पेक्षा तापमानात जास्त वाढ झाल्यास त्याला तीव्र उष्णतेची लाट म्हणतात. भारतात हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार मैदानी भागात 40 डिग्री अंश सेल्सीअस, डोंगराळ भागात 30 डिग्री अंश सेल्सीअसपेक्षा व समुद्र किनारी भागात 37 अंश डिग्रीपेक्षा जास्त तापमान जात असल्यास त्यास उष्मलाट प्रवण क्षेत्र मानले जाते. तापमानात झालेली वाढ ही हवामान खात्याच्या 2 उपविभागामध्ये सलग दोन दिवस 4.5 डिग्रीपेक्षा जास्त नोंदवल्यास दुसऱ्या दिवशी उष्मलाट म्हणून जाहीर केली जाते.
उष्मा-लहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे. उष्माघात हा एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे जो शरीराच्या तापमानाचे नियंत्रण यंत्रणा असफल झाल्याने होतो. प्रखर उष्णतेमुळे शरीराचे तापमान 40 अंश सेल्सीअस किंवा त्याहून अधिक होते. ज्यामुळे विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतो. योग्य वेळी उपचार न केल्यास उष्माघात प्राणघातक ठरू शकतो.
उष्माघाताची कारणे
उष्माघात शारीरिक श्रम करत असताना, विशेषतः उन्हात काम करताना किंवा व्यायाम करताना होतो. खेळाडू, मजूर, शेतकरी यांना धोका अधिक असतो. दीर्घकाळ प्रखर उन्हात किंवा उष्ण वातावरणात राहिल्यास होतो. लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, तसेच ज्या लोकांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रण कमी असते त्यांना याचा जास्त धोका असतो.
उष्माघाताची लक्षणे?
- घाम येणे थांबते
- चक्कर येणे आणि थकवा
- डोकेदुखी, मळमळ, उलट्या
- हृदयाचे ठोके वाढणे
- भान हरपणे, गुंगीत जाणे किंवा बेशुद्धावस्था
- हात-पाय मुरगळणे किंवा झटके येणे.
- उष्माघाताचा धोका पुढील गटांसाठी अधिक असतो:
उष्माघात टाळण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या
- भरपूर पाणी प्या
- जरी तहान लागली नसली तरी दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्या.
- हलके आणि सैलसर कपडे परिधान करा
- उष्ण हवामानात सुती कपडे घाला.
- थेट उन्हापासून बचाव: शक्यतो दुपारच्या वेळेस (११ ते ४) बाहेर जाणे टाळा.
- शारीरिक श्रम कमी करा: प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळा.
- योग्य आहार घ्या: फळांचे रस, नारळ पाणी, ताक यांचा समावेश आहारात करा.
- उष्माघात ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे लक्षणे ओळखणे, तातडीने कृती करणे आणि योग्य प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. गरम वातावरणात स्वतःची काळजी घेणे आणि इतरांनाही सावध करणे गरजेचे आहे.