Pune News: पुणेकरांना वाहतुकीचा एक सोयीचा आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुणे मेट्रोचा डेली पास देखील उपलब्ध आहे. फक्त 100 रुपयांमध्ये हा पास घेऊन प्रवासी दिवसभर पुणे मेट्रोच्या दोन्ही कॉरिडॉरवर कितीही प्रवास करू शकतात. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा पास वैध असतो. नोकरी करणाऱ्यांसाठी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हा पास एक उत्तम पर्याय आहे.
डेली पासचे फायदे
100 रुपयांच्या डेली पासमुळे प्रवाशांना पुणे मेट्रोच्या संपूर्ण नेटवर्कवर अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते. यामध्ये पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रामवाडी या दोन्ही मार्गांचा समावेश आहे. पासधारक वैध कालावधीत कोणत्याही स्टेशनवर अनेक वेळा चढ-उतार करू शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रवसासाठी स्वतंत्र तिकीट (Ticket) खरेदी करण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचेल.
(नक्की वाचा- Pune News: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना AI च्या मदतीने धडा शिकवणार; पुणे पोलिसांचा अभिनव प्रयोग)
पास कसा खरेदी कराल?
प्रवाशांना हा पास कोणत्याही पुणे मेट्रो स्टेशनवरील तिकीट काउंटरवर खरेदी करता येईल. हा पास एका सिंगल प्रवासाच्या तिकिटासारखाच दिला जातो. पण त्याची वैधता पूर्ण दिवसासाठी असते. या पासबद्दल अधिक माहितीसाठी प्रवासी पुणे मेट्रोच्या हेल्पलाइन 1800-270-5501 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा अधिकृत वेबसाइट (www.punemetrorail.org) ला भेट देऊ शकतात.
(नक्की वाचा: माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी, पुणेकरांसाठी आनंदवार्ता )
प्रवासी आणि मेट्रोलाही फायदा
या दोन्ही मार्गांवर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. हा 100 रुपयांच्या डेली पासमुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात, जेव्हा नागरिक दर्शनासाठी आणि खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, तेव्हा हा पास त्यांना खूप फायदेशीर ठरेल. यामुळे मेट्रोलाही अधिक उत्पन्न मिळेल आणि शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे .