Abhijeet Dipke Educational Expenses : सध्या देशभरात क्रॉक्रोज जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातही सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या शिक्षणाबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. सीजेपीच्या आंदोलनाला विदेशातून पैसा पुरवण्यात आल्याचाही आरोप होत आहे. फक्त एवढच नाही तर अभिजीत दिपकेंच्या विदेशातील शिक्षणावर खर्च कुणी केला? असा सवाल करत दिपके कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासण्याचीही मागणी करण्यात येत आहे. याबाबत अभिजीत दिपके यांनी स्वत: मोठा खुलासा केला आहे.
शैक्षणिक खर्चाबद्दल अभिजीत दिपके काय म्हणाले?
ते म्हणाले, 'मी माझे स्कॉलरशिपचे लेटर आणि डिग्रीचे लेटर दाखवायला तयार आहे. पण माझे म्हणणे आहे की, पंतप्रधानांनीही त्यांची डिग्री दाखवायला हवी आणि ती सार्वजनिक करायला हवी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मीही माझे स्कॉलरशिपचे लेटर आणि शिक्षणाची डिग्री सार्वजनिक करायला तयार आहे. त्यांना माझ्या घरापर्यंत येऊन द्या आणि त्यांना जी चौकशी करायची आहे ती करू द्या'. वरिष्ठ पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना दिपके यांनी सांगितलं की, माझ्या शिक्षणाचा खर्च बोस्टन विद्यापीठाकडून मिळालेल्या स्कॉलरशीपमुळे झाला. याशिवाय मी एज्युकेशन लोनही घेतलं होतं. आता मला हे लोन फेडायचं आहे. अभिजीत दिपके यांचे वडील MIDC चे निवृत्त ज्यूनियर इंजिनियर आहेत.
गुजरातचे अमित तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचा शैक्षणिक खर्च आणि वडिलांच्या आर्थिक प्रकरणांची चौकशीची मागणी केली आहे. अमित तिवारी यांनी म्हटलं की, महिन्याला जवळपास ६० ते ६५ हजार रुपये कमविणारा सरकारी कर्मचारी आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत कसा पाठवू शकतो?
काही वृत्तसंस्थांनुसार, सर्वसाधारणपणे अमेरिकीतील प्रतिष्ठित विद्यापीठात मास्टर्स कोर्ससाठी ट्यूशन फी, वसतिगृह, भोजन, आरोग्य विमा आणि अन्य खर्च मिळून जवळपास ३० लाखांपासून ते १ कोटींपर्यंत येऊ शकतो.
अभिजीत दिपके याच्या राजकीय प्रवेशाचीही चर्चा...
एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांच्या टिप्पणीतून जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यातही सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या राजकीय प्रवेशाबाबत अधिक उत्सुकता आहे. पण अभिजीत दिपकेंना त्याबाबत विचारलं असता, त्यांनी आपल्या राजकारणातल्या प्रवेशाची शक्यता साफ फेटाळून लावलीय. इन्स्टाग्रामवर स्थापना झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने रस्त्यावरच्या लढाईत उतरून आपलं राजकीय उपद्रवमुल्य दाखवून दिलंय.
नक्की वाचा - डिसेंबर-जानेवारीत अभिजीत दिपकेच्या लग्नाचा बार उडवणार? आईने सांगितलं कशी हवीये सून...
तब्बल 12 वर्षांपासून केंद्रात असलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची किमया करत दिपकेंनी सरकारविरोधातल्या आवाजाला एक चेहरा प्राप्त करून दिलाय. त्यामुळे साहजिकच जंतरमंतरवरच्या यशस्वी आंदोलनानंतर दिपकेंच्या राजकीय प्रवेशाचे अंदाज व्यक्त केले जातायत. अशातच सोमवारी अभिजीत दीपकेच्या संभाजीनगरातल्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीच्या कोअर टीमची एक महत्वाची बैठक पार पडली. सीजेपीच्या भविष्यातल्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीपुर्वी माध्यमांशी संवाद साधताना दिपकेंनी त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत भाष्य केलंय. ते म्हणाले, “मला असं वाटतं की, प्रसारमाध्यमांना जास्त उत्सुक्ता लागली आहे की आम्ही राजकीय पक्ष बनवावा. या देशात जेवढे राजकीय पक्ष आहेत, मला वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्यापासून निराश आहात. आम्हाला ही सामाजिक चळवळच ठेवायची आहे. देशातली सध्या राजकीय स्थिती पाहता अजून एक राजकीय पक्ष बनवून काय करणार?”
CJP समोरची आव्हानं
- एका यशस्वी आंदोलनानंतर पुन्हा नव्या मुद्द्यांवर 'जेन झी'चा असाच पाठिंबा मिळेल याची खात्री देता येत नाही.
- पेपरफुटीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थी संघटना, डावे गट किंवा सर्वसामान्य युवक सीजेपीच्या झेंड्याखाली एकवटण्याची शक्यता कमी आहे
- व्यंगात्मक मोहिम म्हणून सुरु केलेली चळवळ गांभीर्याने पुढे नेताना प्रतिमा संभाळणं कठीण जाऊ शकतं.
- विरोधी पक्षाकडून ही संपूर्ण मोहिम ताब्यात घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेता विरोधकांची ‘बी-टीम' असाही शिक्का बसण्याची भीती आहे.
- सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलीही अधिकृत नोंदणी नसलेली सामाजिक चळवळ असेल तर निधी उभारणी, कायदेशीर लढाई आणि दीर्घकालीन नेतृत्वाचे प्रश्न उभे राहू शकतात.
एकूणच दिपकेंची सध्याची भूमिका पाहता थेट राजकारणात उतरण्याऐवजी सरकारच्या कारभारावर वचक ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. ब्रिटीश राज्यव्यवस्थेत जशी शॅडो कॅबिनेटची व्यवस्था आहे, तशा भूमिकेत राहून सरकारच्या चुकांवर प्रहार करत राहण्याची सीजेपीची रणनीती दिसतेय. पण अशा अनेक सामाजिक चळवळी एखाद दुसऱ्या यशानंतर हळूहळू निष्प्रभ झाल्याची उदाहरणं इतिहासात आहेत. त्यामुळे फक्त सामाजिक चळवळीच्या माध्यमातून भारताच्या राजकीय व्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव टाकण्याचा सीजेपीचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो,हे पाहावं लागेल.