मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांसह नागरिकांना चिरडलं. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 49 जण जखमी झाले आहेत. बाईक, रिक्षा, चारचाकी अशा अनेक वाहनांचं देखील नुकसान झालं आहे.
बेस्टची 332 क्रमांकाची बस एका सोसायटीची भिंत तोडून एका पोलवर आदळली आणि थांबली. काही मिनिटे आणि 100-150 मीटर परिसरात झालेल्या या अपघाताने अनेकाचा थरकाप उडाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
(नक्की वाचा- CCTV Footage : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बस गर्दीत शिरली, 5 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी)
कोण आहे बस चालक?
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली. संजय मोरे असे आरोपी बस चालकाचे नाव असून तो 54 वर्षांचा आहे. कुर्ला पोलिसांनी संजय मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चालक संजय मोरे हा 1 डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आलं आहे. अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण? असा सवाल आता विचारला जात आहे.
ही घटना घडली तेव्हा बेस्टच्या बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते, अशी माहिती सूत्राकंडून मिळत आहे. घटनेत तीन पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. या घटनेत पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) प्रशांत चव्हाण हे देखील जखमी झाले आहेत.
(नक्की पाहा- कुर्ल्यातील अपघाताची भीषणता दाखवणारे Photos)
बस अपघातातल्या मृतांची नावे
- विजय विष्णू गायकवाड (70)
- आफ्रीन अब्दुल सलीम शहा (19)
- अनम शेख (20)
- कनिझ फातिमा गुलाम कादरी (55)
- शिवम कश्यप (18)