मनोज सातवी, पालघर
पालघर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात तक्रार दिल्याने तक्रारदारांना लक्ष केले जात आहे. याबाबत विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार आणि शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्येनंतर आता, जव्हार शहरातील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक विजय घोलप यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने पालघर जिल्ह्यातला वाल्मीक कराड कोण? जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा पाठीराखा कोण? असा संतप्त सवाल माजी आमदार सुनील भुसारा यांनी उपस्थित केला आहे.
(नक्की वाचा- MPSC प्रश्नपत्रिका 40 लाखात देण्याचं आमीष; 'ती' उच्चपदस्थ महिला अधिकारी कोण? )
अवैध धंद्यांमध्ये राजकीय पुढाऱ्यांचाच हात असल्याचा खळबळजनक आरोप भुसारा यांनी केला आहे. अशा घटनांवर विद्यमान आमदार खासदार मूग गिळून गप्प का आहेत? पालघर जिल्ह्यातील अवैध धद्यांचे समूळ उच्चाटन करून पालघर जिल्ह्याच्या प्रतिमेला लागलेला डाग पुसावा. गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार सुनील भुसारा यांनी पोलिसांकडे केली आहे.
विजय घोलप यांना लोखंडी रॉडच्या साहाय्याने मारहाण करण्यात आल्याने त्यांना दुखापत झाली आहे. विजय घोलप यांच्या फिर्यादी वरून बिलाडी जुगाराचा धंदा करणाऱ्या सात आरोपींविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक धोडी यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आणखी एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेचे पदाधिकारी विजय घोलप यांनी जव्हार शहरातील एसटी डेपो परिसरात निर्मला घाटाळ ऊर्फ फर्नाडीस, फ्रान्चीस फर्नाडीस, मायकल फर्नाडीस, निलम मायकल फर्नाडीस, ज्योती फ्रान्चीस फर्नाडीस, कलीमकाजी आणि त्याच्या पत्नी यांच्यामार्फत सुरु असलेला बिलाडी जुगार बंद करावा म्हणून 14 जानेवारी रोजी जव्हार पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.
(नक्की वाचा- CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली)
त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत जुगाराचा धंदा बंद झाल्याने संतापलेल्या आरोपींनी विजय घोलप यांच्या घरी जाऊन घोलप यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडच्या साहाय्याने जीवे ठार मारण्याचा उद्देशाने हल्ला केला होता. सात जणांनी केलेल्या हल्ल्यात 75 वर्षीय विजय घोलप यांना दुखापत झाली आहे. तसेच हल्ला करणाऱ्यांपासून आपल्या जीवाला धोका असल्याची फिर्याद देखील विजय घोलप यांनी जव्हार पोलीस ठाण्यात दिली आहे. जव्हार पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.