संजय तिवारी, नागपूर
MPSC च्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवण्याचे प्रकार पुण्यात घडले. मात्र या प्रकरणाचे धागेदोरे भंडारा जिल्ह्यापर्यंत जुळलेले आहेत. या प्रकरणी भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन जण फरार आहे. एक महिला अधिकारी या प्रकारातील मुख्य सूत्रधार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. फरार तरुणांचा शोध लागल्यास या महिला अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
MPSC च्या परीक्षार्थीना फोनद्वारे परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचं आमीष दाखवत 40 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बालाघाट येथील वारशीवनीचा 25 वर्षीय दीपक यशवंत साखरे तर भंडारा जिल्ह्यातील वरठी येथून 28 वर्षीय सुरेंद्र वाघमारे या दोघांना ताब्यात घेतले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या घोटाळ्यातील दोन मुख्य आरोपी असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील असल्याची माहिती आहे. त्यांची नावे आशिष नेतलाला कुलपे आणि प्रदीप नेतलाला कुलपे अशी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेतला आहे. एक उच्च पदस्थ महिला अधिकारी याची मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांना आहे.
(नक्की वाचा- CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली)
अटकेत असलेल्या सुरेंद्र वाघमारे याच्याकडून या संदर्भात माहिती मिळाल्याने त्या महिला अधिकाऱ्याच्या दिशेने तपास सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. एमपीएससी परीक्षार्थीना फोनद्वारे प्रश्नपत्रिका देण्याची लालुच दाखवली जात होती. त्यासाठी तब्बल 40 लाख रुपये मागणी करण्यात येत होती. विश्वास बसवण्यासाठी व्हिडीओ कॉल सुद्धा करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते.
(नक्की वाचा - Union Budget 2025: शेतकरी ते AI.. बजेटमधून कुणाला काय मिळालं? वाचा 10 मोठ्या घोषणा)
या उच्च अधिकारी महिलेचे बऱ्यापैकी राजकीय संबंध असल्यामुळे आपल्याला काही होणार नाही अशी तिला खात्री होती. मात्र आता तपासाची चक्रे तिच्या दिशेने फिरत असून तिचे कॉल डिटेल्स आणि अन्य माहिती काढण्याचे काम पुणे पोलीस करत आहेत. तिच्या हालचालींवर देखील नजर ठेवण्यात येत असून लवकरच या प्रकरणाचा पर्दाफाश होईल, अशी उच्च अधिकाऱ्यांना खात्री वाटत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world