Ajit Pawar Last Rites: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज, 29 जानेवारी रोजी बारामती येथे शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र केंद्राचे प्रतिनिधित्व गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
अजित पवार यांना जनसागराने पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. सकाळपासूनच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. "अजितदादा परत या", "अजितदादा अमर रहे" अशा घोषणांनी बारामतीचा परिसर दणाणून गेला होता.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून शोकसंदेश पाठवला असून, त्यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बारामतीत येऊन श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर राज्यांतील मंत्र्यांनीही हजेरी लावली.
(नक्की वाचा- VIDEO: "दादाला 'I Love You' सांग...", अजित पवारांच्या चाहत्याची पार्थ पवारांना भावनिक साद)
विमान अपघाताचा तपास
28 जानेवारी रोजी झालेल्या या भीषण अपघाताच्या मुळाशी जाण्यासाठी दोन स्तरावर तपास सुरू झाला आहे. AAIB (नागरी विमान वाहतूक मंत्रालय) ने तांत्रिक तपासासाठी विमानातून ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे. यातून वैमानिकांचे शेवटचे संभाषण आणि तांत्रिक बिघाडाची माहिती समोर येईल. तर पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. हा तपास आता महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात येणार आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar: कामाचा माणूस हरपला! महाराष्ट्राच्या हिताचे अजित पवार यांनी घेतलेले 10 मोठे निर्णय)
अपघातातील 5 जणांचा मृत्यू
- अजित पवार (उपमुख्यमंत्री)
- विदीप जाधव (खाजगी सुरक्षा रक्षक - PSO)
- पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)
- कॅप्टन सुमित कपूर (मुख्य वैमानिक)
- कॅप्टन शांभवी पाठक (सह-वैमानिक)