Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेले अपघाती निधन ही राज्यासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी केवळ सत्तेची पदे भूषवली नाहीत, तर आपल्या प्रशासकीय कौशल्याने आणि धडाडीच्या निर्णयांनी राज्याच्या विकासाला एक नवी दिशा दिली.
अजित पवार हे त्यांच्या शिस्तीसाठी आणि वेगवान निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात. वित्त, नियोजन आणि जलसंपदा यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळताना त्यांनी घेतलेले निर्णय आजही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात. अजित पवार यांच्या राजकीय प्रवासातील १० ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयांचा आढावा घेऊयात.
राज्याचे 'फायनान्स मॅनेजर'
अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीवर आपली पकड मजबूत ठेवली. त्यांनी जिल्ह्यांच्या निधी वितरणात वेग आणला आणि करचोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलली. जीएसटी संकलनात महाराष्ट्राला देशात प्रथम स्थानी ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
जलसंपदा क्षेत्रात क्रांती
जलसंपदा मंत्री असताना त्यांनी कृष्णा खोरे, मराठवाडा आणि कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती दिली. दुर्गम भागातील शेतीला पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला, ज्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली.
(नक्की वाचा- Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर 10 प्रश्न अनुत्तरित; कुटुंबीय, सहकाऱ्यांसह सगळेच चिंतेत )
पदकविजेत्या खेळाडूंना थेट सरकारी नोकरी
क्रीडामंत्री असताना खेळाडूंचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी त्यांनी पदकविजेत्या खेळाडूंना 5 टक्के आरक्षणांतर्गत थेट सरकारी नोकरी देण्याचे धोरण राबवले. तसेच ग्रामीण भागातील टॅलेंटला शहरात येण्याची गरज पडू नये म्हणून 'तालुका क्रीडा संकुल' उभारण्यावर भर दिला.
आधुनिक शेतीला प्रोत्साहन
अजित पवार यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बांबू लागवडीसारख्या नव्या प्रयोगांना प्रोत्साहन दिले. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले. ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी त्यांनी दूध संघ आणि स्थानिक बँकांवर लक्ष केंद्रित करणारी धोरणे मजबूत केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
2024 च्या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला.
(नक्की वाचा- Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन; जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलणार?)
विकासाची 'पंचसूत्री'
राज्याच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य आणि उद्योगांवर लक्ष केंद्रित करणारी 'पंचसूत्री' मांडली. 2025 च्या बजेटमध्ये त्यांनी महाराष्ट्रात 40 लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे ध्येय ठेवले होते.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
सुशिक्षित बेरोजगारांसाठी दरवर्षी 10 लाख इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणारी ही योजना त्यांनी सुरू केली. यामध्ये 12 वी पास ते पदवीधरांना दरमहा 6000 ते 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाते.
तांत्रिक शिक्षणात 'पीएम सेतू' योजना
नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील ITI मध्ये 'पीएम सेतू' योजना राबवून तरुणांना जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
(नक्की वाचा- Ajit Pawar : 66 वर्षे 6 महिने 6 दिवस! अजित पवारांना 6 च्या फेऱ्याने घेरलं; 6 आकडा अन् मृत्यूचा काय आहे संबंध?)
पायाभूत सुविधांचा विस्तार
पुणे मेट्रोचा विस्तार आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील लोणावळा घाटातील 'मिसिंग लिंक' प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी जातीने लक्ष घातले. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी होणार आहे.
हरित ऊर्जा आणि वीज दर कपात
पुढील 5 वर्षांत 1.13 लाख कोटी रुपयांची वीज खरेदी बचत करण्यासाठी त्यांनी 'ग्रीन एनर्जी'कडे वळण्याचे धोरण आखले. यामुळे उद्योगांना मिळणाऱ्या विजेचे दर कमी होऊन राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world