कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते टिकेचे धनी बनले आहेत. माणिकराव ठाकरे विधिमंजळात रमी गेम खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रावादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर कोकाटे यांच्यावर चहूबाजूने टीका होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यापूर्वीही त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृतींमुळे चर्चेत राहिलेआहेत. यामुळे महायुतीतील काही नेत्यांचे असे मत आहे की, कोकाटे यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, जेणेकरून एक योग्य मेसेज जाईल. हे पाऊल महायुतीची प्रतिमा जपण्यासाठी महत्त्वाचे ठरेल, असे काही नेत्यांना वाटत आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Politics: 'रम, रमी, रमणी आणि हनी ट्रॅपचे महामंडळ', ठाकरे गटाचे सरकारवर टीकास्त्र)
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही (NCP) दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांच्यावर माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करावी यासाठी दबाव असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या संवेदनशील मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही समजते.
राजकीय वर्तुळात आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की, अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची भूमिका घेणार का? ही परिस्थिती महायुतीसाठी एक कठीण आव्हान निर्माण करू शकते, कारण सरकारमधील अंतर्गत मतभेद समोर येत आहेत.
सध्या तरी माणिकराव कोकाटे स्वतः राजीनामा देणार की, महायुतीमधील मित्रपक्षांच्या दबावामुळे पक्षश्रेष्ठी त्यांचा राजीनामा घेणार, याबाबत अनिश्चितता आहे. या घडामोडींवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काळात काय वळण लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्ये
शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना
कोकाटे यांनी एका रुपये पीक विमा योजनेवर बोलताना म्हटले होते की, "आजकाल भिकारी देखील एक रुपया घेत नाही, परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देतोय." या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाल्याची टीका झाली.
(नक्की वाचा- Exclusive: 'हनी ट्रॅपबाबत खुलासा होऊन जाऊ द्या',गिरीश महाजन यांचे आव्हान)
पिकांच्या पंचनाम्यावर प्रश्न
अवकाळी पावसामुळे शेतमालाच्या नुकसानीच्या पाहणीदरम्यान कोकाटे यांनी शेतकऱ्यांना विचारले, "काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?" यावर त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिले की ते असे बोलले नाहीत, परंतु या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता.
कृषिमंत्रिपदाची तुलना
माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्रिपदाची तुलना "ओसाड गावची पाटीलकी"शी केली. ज्यामुळे शेतकरी आणि विरोधकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला.
कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या खर्चावर टीका
नाशिकमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना कोकाटे म्हणाले, "तुम्ही कर्ज घेता, फेडत नाही आणि कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न समारंभावर खर्च करता. शेतीच्या विकासासाठी एक पैसा गुंतवत नाही." विरोधकांनी यावरून सरकारवर टीका केली. त्यानंतर कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
कांद्याच्या बाजारभावावर शेतकऱ्यांना दोष
कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावावर बोलताना कोकाटे म्हणाले होते की, "एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या भावाचा फायदा झाला म्हणून सगळे कांदा लावत सुटतात. पन्नास पटीने लागवड केली तर भाव पडणारच."
रमी गेम प्रकरण
विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान कोकाटे यांचा मोबाइलवर ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर विरोधकांनी, विशेषत: रोहित पवार यांनी, शेतकरी संकटात असताना मंत्री गेम खेळत असल्याची टीका केली. कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले की ते फक्त जाहिरात स्किप करत होते, परंतु यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता होत आहे.