Navi Mumbai News: सिडकोच्या (CIDCO) विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील घरांच्या वाढलेल्या किमती कमी करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली ही बैठक अखेर झाल्याने सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत सिडको अधिकाऱ्यांसमोरच नाराजी व्यक्त केली. सिडकोच्या घरांची मूळ किंमत आणि सध्याची विक्री किंमत यामध्ये मोठी तफावत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
(नक्की वाचा- साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत अधिकाऱ्यांना असं चालणार नसल्याचं सांगितलं. गरिबांसाठी आणि सामान्य जनतेसाठी ती घरं आहेत. त्यांच्या आवाक्याबाहेर किंमत जाता कामा नये. अधिकाऱ्यांनी घरांच्या किंमत वाढीची कारणे स्पष्ट केली असली तरी, उपमुख्यमंत्र्यांनी सामान्यांचे हित सर्वोच्च मानून किंमत कमी करण्याच्या दिशेने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.
(नक्की वाचा- Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोळेगावमध्ये 21 डिसेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल)
सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय या बैठकीत झाला नाही. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे.