Pune Rains News : पुण्यात गुरुवारी अनेक भागात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या. त्यानंतर आज देखील पुण्याचा हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज देखील पुण्याच पावसाच्य हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातूनही पाण्याचा विसर्ग मुठा नदीत वाढवण्यात आला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून 4675 क्यूसेक विसर्ग सुरू होता, जो सकाळी 8 वाजता वाढवून 6843 क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग पुन्हा कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही अलर्ट
पुढील 3 तासांत पुणे जिल्ह्यासह अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे येथे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.