प्रविण मुधोळकर, नागपूर
Nagpur News: युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना 10 लाखाची खंडणी मागून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्ता प्रशांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात खंडणीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी 15 ते 19 मार्च दरम्यान पुणे ते मुंबई अशी युवा आक्रोश यात्रा काढली होती. या यात्रेत प्रशांत गायकवाड सहभागी झाला होता आणि यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात काही युवकांना आणले, याचे मला पैसे द्या अशी मागणी तो कुणाल यांच्याकडे करू लागला. पैसे न दिल्यास समाज माध्यमावर बदनामी करण्याची धमकी दिली.
(नक्की वाचा- Donald Trump U Turn ट्रम्प पलटले,आता म्हणतात मी शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही)
कुणाल राऊत यांचे मेहुणे अभिषेक यांच्याशी वाद घालून कुणाल यांनी दहा लाख रुपये दिले नाही तर त्यांचे राजकीय करियर खराब करेन अशी धमकी दिली. त्यानंतर कुणाल राऊत यांनी सीताबर्डी पोलिसात तक्रार देऊन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मात्र युवा आक्रोश यात्रा काढली तेव्हा काही व्हेंडर नेमण्याची जबाबदारी प्रशांत गायकवाड यांच्याकडे होती. त्याचे पैसे मागण्यासाठी तो नागपुरात आला होता. त्याचे पैसे कुणाल राऊत देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार प्रशांत गायकवाड यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यानंतर कुणाल राऊतानी प्रशांत विरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.