Kalyan News: सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी! फार्मा कंपनीच्या झोनल मॅनेजरनं बदनामीच्या भीतीने संपवलं जीवन

Kalyan Crime News: कल्याणमध्ये सायबर फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून फार्मा कंपनीच्या मॅनेजरने आत्महत्या केली. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

kalyan Crime News: कल्याणमध्ये सायबर गुन्हेगारीचे एक भीषण स्वरूप समोर आले असून, ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून एका प्रतिष्ठित फार्मा कंपनीच्या झोनल मॅनेजरने आपले जीवन संपवले आहे. सायबर भामट्यांनी बदनामीची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते.

कल्याण पूर्व भागातील कैलास नगर परिसरात राहणाऱ्या हेमंत पांडे या उच्चपदस्थ व्यक्तीने सायबर गुन्हेगारांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. हेमंत पांडे हे एका नामवंत फार्मा कंपनीमध्ये झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या माहितीमुळे सायबर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

7 जानेवारी रोजी घेतला अखेरचा श्वास

हेमंत पांडे यांनी 7 जानेवारी 2026 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. सुरुवातीला कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्यांच्या भावाने आणि कुटुंबीयांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या आत्महत्येमागचे 'सायबर कनेक्शन' उघड झाले.

(नक्की वाचा-  VIDEO: किंकाळ्या, धडपड अन् वेदना; भटक्या कुत्र्यांनी 15 मिनिट लचके तोडले, महिलेचा तडफडून जागीच मृत्यू)

बँक स्टेटमेंटमधून उलगडले गुपित

हेमंत पांडे यांच्या आत्महत्येचे कारण शोधत असताना धक्कादायक बाबी समोर आल्या. हेमंत यांनी त्यांच्या एका मित्राकडे 1 लाख 60 हजार रुपयांची तातडीने मागणी केली होती. "मला कोणाला तरी 2 लाख रुपये द्यायचे आहेत," असे त्यांनी मित्राला सांगितले होते.

10 जून 2025 ते 5 जानेवारी 2026 या सहा महिन्यांच्या काळात हेमंत यांनी एका अज्ञात व्यक्तीला वारंवार पैसे पाठवले होते. आरोपीने हेमंत यांचे काही फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या मित्रांना पाठवण्याची आणि परिसरात व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.

(नक्की वाचा-  Shocking News: हृदयद्रावक! मेकॅनिकचा एक सल्ला अन् अख्ख कुटुंब उद्ध्वस्त; 3 नातवांसह आजोबांचा झोपेतच मृत्यू)

कोळशेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

तपासादरम्यान सायबर ब्लॅकमेलिंगचा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर, कोळशेवाडी पोलिसांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस आता त्या बँक खात्यांचा आणि मोबाईल क्रमांकांचा तांत्रिक तपास करत आहेत, ज्याद्वारे हेमंत यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. कोणीही तुमचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यास घाबरून पैसे न देता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article