विश्वचषकाच्या विजयानंतर भारतीय संघाला बीसीसीआयकडून 125 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. यानंतर पुन्हा राज्य शासनाकडूनही अकरा कोटींचं बक्षीस देण्यात आलं. यावरून अनेकांकडून टीका व्यक्त केली जात आहे. तर काही जणांकडून राज्यशासन इतर खेळांकडे उपेक्षितपणे बघत असल्याच्या प्रतिक्रिया क्रीडा विश्वातून येत आहेत.
T20 विश्वचषक विजयानंतर भारतीय संघावर बक्षीसांचा पाऊस पडला. हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी या मल्लांना मिळणारे महिन्याचे मानधन काही दिवसांपासून थकीत आहे. त्यामुळे कुस्तीगीरांकडून सरकारने देऊ केलेल्या बक्षीसावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारनं आमच्याकडेही पहावं अशा आर्त हाक पैलवानांकडून देण्यात येत आहेत.
1995 पासून कुस्तीगीरांना मानधन देण्यास सुरुवात झाली. 1997 रोजी मानधनात एक हजार रुपयांची वाढ झाली. 1998 नंतर मानधनात पु्न्हा एक हजार रुपयात वाढ होऊन 3000 पर्यंत करण्यात आलं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 4000 हजारापर्यंत मानधन करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी दोन्ही मल्लांना 6000 रुपये असं मानधन देण्यात आलं.
नक्की वाचा - शिक्षकासाठी विद्यार्थी अधिकाऱ्यांशीही भिडले; ZP शाळेतील 'त्या' घटनेची जोरदार चर्चा
अनेक वेळा हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवानांनी तत्कालीन मंत्रिमंडळाला भेटी दिली आणि मानधनात वाढ करा अशी मागणी केली आहे. यासाठी अनेकवेळा निवेदनं सादर करण्यात आली. मात्र सरकार आमच्याकडे उपेक्षितपणे पाहत...मायबाप सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आमचं जगणं कठीण होईल; अशा प्रतिक्रिया कुस्ती विश्वातून येत आहे. मल्लांना शरीरयष्टी सक्षम ठेवण्यासाठी चांगल्या आहाराची गरज असते. त्यामुळे महिन्याचा खर्च जास्त होतो. नोकरीचा अभाव, तुटपुंजे मानधन व प्रायोजक मिळत नसल्याने हा खर्च पेलणे कुस्तीपट्टूंना कठीण झाले आहे. कुस्तीपैलवानांना महाराष्ट्राला कुस्तीची अखंड परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी या खेळाला आश्रय दिला. मात्र सध्या याच खेळाकडे सरकार दुर्लक्ष केलं जातंय का? हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी या मल्लांना मिळणारं महिन्याचं मानधन गेल्या दहा महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांवरून क्रीडाप्रेमींनी आता नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. पाचही बोटं तुपात असलेल्या क्रिकेट विश्वावर महाराष्ट्र सरकारने कुस्ती पैलवानांवर कानाडोळा केलाय का?