Asia Cup 2025: क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहते आतुर असतात, पण कधी कधी खेळाडूंच्या नावावर काही असे विक्रम नोंदवले जातात, जे त्यांच्यासाठीही नावडते असतात आणि ते कोणीही लक्षात ठेवू नये अशी त्यांची इच्छा असते. आशिया कप क्रिकेट स्पर्धा जवळ आली (Asia Cup Schedule) असून या पार्श्वभूमीवर एक नकोसा विक्रम चर्चेत आला आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप-2025 मध्ये टी20 फॉरमॅटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेत सर्वाधिक वेळा 'शून्या'वर बाद होण्याचा विक्रम कोणत्या देशातील क्रिकेटपटूच्या नावावर आहे माहिती आहे का?
नक्की वाचा: 'विराट, रोहितनं अंतर्गत राजकारणामुळेच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली', माजी भारतीय खेळाडूचा BCCI वर आरोप
कोण आहे हा क्रिकेटपटू?
मशरफे मुर्तजा असं या क्रिकेटपटूचं नाव असून तो बांगलादेशतर्फे खेळतो. आशिया कपच्या टी20 फॉरमॅटच्या इतिहासात मुर्तजा 3 वेळा ‘शून्य'वर बाद झाला आहे. विशेष म्हणजे, त्याचा हा नकोसा विक्रम एकाच स्पर्धेत नोंदवला गेला आहे. आशिया कप-2016 मध्ये मुर्तजा तीनवेळा शून्यावर बाद झाला होता. त्या स्पर्धेत त्याने एकूण 5 सामने खेळले होते. मशरफेने गोलंदाजीत मात्र ठीकठाक कामगिरी केली आहे, त्याने 22.80 च्या सरासरीने 5 बळी टीपले आहेत. मात्र फलंदाजीत तो पूर्णपणे अपयशी ठरला. 5 डावांमध्ये फलंदाजीला उतरलेल्या मुर्तजाने केवळ 3.50 च्या सरासरीने 14 धावा केल्या, ज्यात फक्त 2 चौकारांचा समावेश होता.
सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणारे अन्य क्रिकेटपटू कोण?
आशिया कप (टी20) मध्ये सर्वाधिक ‘शून्या'वर बाद झालेल्या खेळाडूंच्या यादीत मुर्तजा अव्वल स्थानी आहे. त्याच्या नंतरच्या स्थानावर अनेक क्रिकेटपटू आहेत, जे प्रत्येकी 2 वेळा ‘शून्या'वर बाद झाले आहेत. या क्रिकेटपटूंमध्ये श्रीलंकाचा चरीथ असलंका, पाकिस्तानचा आसिफ अली, हाँगकाँग-चायनाचा किंचित शाह, श्रीलंकाचा कुसल मेंडिस, भारताचा हार्दिक पांड्या आणि श्रीलंकाचा दासुन शनाका यांचा समावेश आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, टी20 फॉरमॅटमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याच्या नादात अनेक दिग्गज खेळाडूही दबावाखाली येतात.
नक्की वाचा: आशिया कपमधून रिंकू सिंगचा पत्ता कट?
भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला
आशिया कप-2025 मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र भारताने पाकिस्तानविरूद्ध खेळू नये यासाठी बीसीसीआयवर दबाव आणला जात आहे. भारतीय संघ 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध आपला तिसरा सामना खेळेल. ग्रुप-ए मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई हे संघ आहेत, तर ग्रुप-बी मध्ये बांगलादेश, श्रीलंका, हाँगकाँग-चायना आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.