पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. बीसीसीआयने ही बाब आयसीसीला कळवली आहे. ईसएपीएन क्रिकइन्फोने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 8 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आले आहे. बीसीसीआयने भारतीय संघाचे या स्पर्धेतील सामने हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात यावेत असे सुचवले आहे.
नक्की वाचा : KL Rahul Athiya Shetty: केएल राहुल लवकरच होणार बाबा, आथिया शेट्टीनं दिली गुड न्यूज
त्रयस्थ ठिकाणी सामन्यांचा प्रस्ताव
बीसीसीआयने भारतीय संघाचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात यावेत असा प्रस्ताव दिला आहे. हे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) किंवा श्रीलंकेत खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानपासून कमी अंतरावर असल्याने हे सामने युएईमध्ये खेळवण्यात येण्याची शक्यता जास्त आहे. बीसीसीआयने आपला निर्णय कोणत्या मार्गाने कळवला आहे हे अद्याप कळालेले नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय जो निर्णय घेईल तो लेखी स्वरुपात द्यावा अशी मागणी केली होती. हायब्रीड मॉडेलसंदर्भात अद्याप काहीही बोलणे झालेले नाही मात्र यासंदर्भात बोलण्यासाठीही पीसीबी तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन!
फेब्रुवारी 2025 मध्ये स्पर्धेचे आयोजन
या स्पर्धेला 100 दिवस उरले असून 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे संघ 2 गटात विभागण्यात आले आहेत. पहिल्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलँड आणि बांगलादेशचा समावेश आहे. दुसऱ्या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आलेले नाहीये, मात्र भारत आणि पाकिस्तानचा सामना 1 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.
भारताचे सगळे सामने पीसीबीने लाहोरमध्ये ठेवले होते. मात्र बीसीसीयने घेतलेल्या निर्णयानंतर पीसीबीला वेळापत्रक आणि सामन्यांची ठिकाणे याबाबत नव्याने विचार करावा लागेल. यापूर्वी 2008 साली भारतीय संघ पाकिस्तानात गेला होता. महेंद्रसिंह धोनी तेव्हा कर्णधार होता आणि भारतीय संघाला अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.