मुंबई: महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असून याचसंदर्भात शिंदेंनी 22 फेब्रुवारी रोजी अमित शहांची पुण्यात भेट घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. भल्या पहाटे झालेल्या या भेटीवेळी शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली तर अमित शहांनी त्यांना भाजपमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिल्याचेही संजय राऊत म्हणालेत. आता संजय राऊतांच्या या दाव्यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले आहे.
NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. चहापानानंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
"विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एका रथाची दोन चाके आहेत. सूड भावनेतून, द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला तसेच उत्तर देईल. शेवटी सहनशिलतेची एक मर्यादा असते. ज्या बातम्या मुद्दाम पेरल्या जातात, त्या आम्हालाही कळतात. ज्याच्याशी कुणाचा संबंध नाही त्याचेही नाव जोडले जाते. तुम्ही एक बाजू ऐकून बातम्या देता. जांच्यावर लोकांचा विश्वास नाही ते खोट्या बातम्या देतात, आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता.." असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
"पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे तुमच्यावरचाही विश्वास कमी होऊ नये. तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज दिल्या तरी आमच्यामध्ये काही ब्रेक होणार नाही. कोल्डवॉर कोल्ड वॉर कुठे आहे? इथे सगळा थंडा थंडा कुल कुल आहे. एखादी बातमी दिल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्याची खरी बातमी छापायला लागते. त्यामुळे केलेले आरोप खरे की खोटे? याची शहानिशा केली पाहिजे..," असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.