इंग्लंडच्या संघाने भारतीय संघावर लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतावर 22 धावांनी रोमांचक विजय मिळवला खरा, मात्र त्यांना या सामन्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. रडीचा डाव खेळणाऱ्या गोऱ्यांना स्लो ओव्हररेटमुळे शिक्षा देण्यात आली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेसाठी इंग्लंडचे दोन गुण कापण्यात आले आहेत, तसेच त्यांच्यावर मॅच फीच्या 10 टक्के दंडही लावण्यात आला आहे.
( नक्की वाचा: 'आयसीसीने याकडे लक्ष देण्याची गरज', लॉर्ड्स टेस्टमधील अंपायरवर अश्विन संतापला )
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार इंग्लंडवर हा दंड आकारण्यात आला आहे. किमान ओव्हर-रेटच्या नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या नियमानुसार, निर्धारित वेळेत षटके न टाकल्यास प्रत्येक ओव्हरसाठी खेळाडूंच्या मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारला जातो.
स्टोक्सने चूक मान्य केली
नियमांनुसार, जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत, तर प्रत्येक कमी ओव्हरसाठी एक गुण कापला जातो. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपली चूक मान्य केली असून त्याने अंपायर रिची रिचर्डसन यांनी सुचवलेला दंडही स्वीकारला आहे. यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. मैदानातील अंपायर पॉल रायफल आणि शरफुद्दौला इब्ने शाहिद, तिसरे पंच अहसान रझा आणि चौथे पंच ग्राहम लॉयड यांनी इंग्लंडने अपेक्षित ओव्हररेट राखला नसल्याचे म्बटले होते.
श्रीलंका दुसऱ्या तर टीम इंडिया चौथ्या स्थानी
लॉर्ड्स कसोटीत स्लो ओव्हररेटसाठी दोषी आढळल्याने इंग्लंडचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या गुणतालिकेतील गुण 24 वरून 22 झाले आहेत. यामुळे त्यांची टक्केवारी 66.67 वरून 61.11 पर्यंत खाली आली आहे. यामुळे, इंग्लंडचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंकेचा संघ आता इंग्लंडच्या संघावर गेला असून तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे, तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
( नक्की वाचा: स्टार्कचा कहर, वेस्ट इंडिजची दाणादाण! अवघ्या 27 धावांवर ALL OUT, 129 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला )
लॉर्ड्स कसोटीत पहिल्या डावात स्कोअर समान झाल्यानंतर इंग्लंडने भारतासमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले होते. रवींद्र जडेजाने नाबाद 61 धावा करून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय संघ 170 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलेला इंग्लंड आता 23 जुलैपासून मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डमध्ये चौथ्या कसोटीत भारताशी भिडणार आहे.