IND vs ENG: वानखेडेवर 'अभिषेक' वादळ, इंग्लंडचा धुव्वा, तब्बल 150 धावांनी धुळ चारली

इंग्लंडचा डाव पत्त्या सारखा कोसळला. त्यांना केवळ 97 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून फिल सॉल्ट वगळता एकाही फलंदाजाला चांगल्या धावा करता आल्या नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारत आणि इंग्लंड यांच्यातला शेवटचा T20 सामना वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला तब्बल 150 धावांनी धुळ चारली. भारताने दिलेलं 248 धावांचे लक्ष गाठताना इंग्लंडचा डाव पत्त्या सारखा कोसळला. त्यांचा संपुर्ण संघ केवळ 97 धावा करु शकला. त्या आधी वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माचे वादळ घोंघावले. त्या वादळात इंग्लंडच्या गोलंदाजांचा अक्षरश:पालापाचोळा झाला. अभिषेक शर्माने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर भारताने 247 धावांचा पल्ला 20 षटकात गाठला. दरम्यान या विजयामुळे भारताने ही मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा सामना खऱ्या अर्थाने अभिषेक शर्माच्या धमाकेदार फलंदाजीने गाजवला. अभिषेक शर्माने इंग्लिश गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. त्याने शतक झळकावताना षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली. या शतकी खेळीत त्याने 13 षटकार आणि 7 चौकार लगावले. विशेष म्हणजे त्याने आपलं शतक केवळ 37 चेंडुत झळकावलं. सर्वात जलद शतक झळकावण्याचा रोहित शर्माचा विक्रम मात्र त्याला मोडता आला नाही. पण एका सर्वाधिक षटकार ठोकण्याचं रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केलं. टी 20 मधील हे त्याचं दुसरं शतक ठरलं. त्यानं 54 चेंडुत 135 धावा केल्या. 

ट्रेंडिंग बातमी - IND vs ENG: अभिषेक शर्माचा वानखेडेत धमाका, रोहित शर्माचा विक्रम मोडता मोडता राहीला

या सामन्यात संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने 15 चेंडुत 24 धावा करत अभिषेक शर्माला साथ दिली. पुढे कर्णधार सुर्यकुमार यादवला आपल्या होम ग्राऊंडवर चमक दाखवता आली नाही. तो केवळ दोन धावा करून बाद झाला. शिवम दुबेने 13 चेंडुत 30 धावा करत भारताला 247 पर्यंत नेले. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 248 धावांचे लक्ष देण्यात आले होते. इंग्लंड भारताला जोरदार प्रतिकार करेल अशी चिन्ह होती. पण तसे काहीच झाले नाही. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

इंग्लंडचा डाव पत्त्या सारखा कोसळला. त्यांना केवळ 97 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून फिल सॉल्ट वगळता एकाही फलंदाजाला चांगल्या धावा करता आल्या नाहीत. फिल ने सर्वाधिक 55 धावा केल्या. केवळ 23 चेंडुत त्याने ही खेळी केली. मात्र दुसऱ्या  बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. ठरावीक अंतराने इंग्लंडचे फलंदाज हे बाद होत गेले. भारताकडून मोहम्मद शामीने 3  तर शिवम दुबे, वरुण चक्रवती आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. फलंदाजी प्रमाणे अभिषेकने गोलंदाजीतही चमक दाखवली.  

Topics mentioned in this article