DC Vs RCB: दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीचे आज अक्षरशः धिंडवडे निघाले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संपूर्ण संघ अवघ्या 75 धावांत तंबूत परतला. टॉस जिंकून बंगळुरूने पहिल्यांदा फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय बंगळुरूच्या बॉलर्सनी सार्थ ठरवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात इतकी खराब होती की, अवघ्या 7 धावांत त्यांचे निम्मे फलंदाज बाद झाले होते. या धक्क्यातून ते शेवट पर्यंत सावरूच शकले नाहीत. बंगळुरूने 9 विकेटने हे सामना जिंकला. बंगळुरूने 6.3 ओव्हर्समध्येच 75 धावांचे लक्ष पुर्ण केले. या बदल्यात फक्त एक विकेट गमावली.
बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. अवघ्या 7 धावांत निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर दिल्लीच्या नावे एका मानहानीकारक विक्रमी नोंद झाली आहे. आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात 5 गडी बाद असताना सर्वात कमी धावसंख्या करणाऱ्या संघांच्या यादीत दिल्ली आता दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. दिल्लीने 7 धावांवर 5 गडी गमावले, मात्र अवघ्या 2 धावांच्या फरकाने ते सर्वात मोठ्या 'कलंका'पासून वाचले.
या बाबतीतला सर्वात खराब रेकॉर्ड अजूनही कोच्ची टस्कर्स केरळच्या नावावर आहे. 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळताना कोच्चीचा संघाने फक्त 6 धावांत 5 गडी गमावले होते. विशेष म्हणजे, याच हंगामात राजस्थान रॉयल्सची अवस्थाही बिकट झाली होती. हैदराबादच्या गोलंदाजांनी राजस्थानचे 5 गडी फक्त 9 धावांत टिपले होते, जे आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शिवाय आयपीएल इतिहासातील पॉवरप्लेमधील सर्वात निचांकी धावसंख्या करण्याचा लाजिरवाणा विक्रम आता दिल्लीच्या नावावर जमा झाला आहे.
जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांनी पूर्णपणे नांगी टाकली. साहिल पारख याला भुवनेश्वर कुमारने शुन्यावर बाद केले. तर लोकेश राहुलचा अडथळ हेझलवूडने दूर केला. त्याला फक्त एक धाव करता आली. नितीश राणा समिर रिझवी यांनी हजेरी लावण्याचं काम केलं. ट्रिस्टन स्टब्सला ही फार काही करता आलं नाही. तो फक्त पाच धावा काढून बाद झाला. कॅप्टन अक्षर पटेल ही शुन्यावर बाद झाला. त्यानंतर अबिशेक पोरेल ने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण 30 धावा काढून तो बाद झाला. त्यानंतर डेव्हीड मिलर ही काही करू शकला नाही. दिल्लीच्या शेपटाला ही जास्त वळू न देण्याची जबाबदारी बंगळुरूच्या बॉलर्सनी घेतली.
नक्की वाचा : IPL 2026 : मैदानात अनर्थ घडला, पण पुढच्या 11 मिनिटांत जे झालं तो चमत्कारच! एन्गिडीसाठी दिल्ली पोलिसांनी...
बेंगळुरूसाठी जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर अनुभवी भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेमध्येच 3 धक्के देऊन दिल्लीचे कंबरडे मोडले. दिल्लीने संघात काइल जॅमिसन आणि दुष्मंथ चमीरा यांचा समावेश करून तीन बदल केले होते. मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. अक्षर पटेलने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य गोलंदाज मुकेश कुमारला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world