Mukul Choudhary Statement: आयपीएल 2026 मध्ये गुरुवारी ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने (LSG) कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) 3 विकेट्सने पराभव केला. या विजयाचा खरा नायक ठरला मुकुल चौधरी. टीम लखनौ जेव्हा संकटात होती, तेव्हा मुकुलने मैदानात पाऊल ठेवले. हार मानण्याऐवजी त्याने पलटवार चढवला आणि केवळ 27 बॉल्समध्ये 54 रन्स केले. मुकुलने आपल्या खेळीत 7 सिक्स आणि 2 फोर ठोकले. या कामगिरीनंतर मुकुलने आपल्या क्रिकेट प्रवासापासून ते कोलकाता विरोधातील खेळीपर्यंतचा प्रवास अत्यंत साध्या शब्दांत मांडला. तसेच क्रिकेट खेळून तो कोणाचे स्वप्न पूर्ण करू इच्छित आहे, देखील त्याने सांगितलं; ज्याची कहाणी अतिशय भावुक आहे.
जेव्हा माझ्या वडिलांचे लग्नही झाले नव्हते...
सामना जिंकल्यानंतर मुकुल चौधरी भावुक झाला होता. आपली कहाणी सांगताना तो म्हणाला, "माझा क्रिकेटचा प्रवास खरं तर तेव्हाच सुरू झाला होता, जेव्हा माझ्या वडिलांचे लग्नही झाले नव्हते. त्यांचे स्वप्न होते की त्यांच्या मुलाने मोठे होऊन देशासाठी क्रिकेट खेळावे. मी लहानपणापासूनच खेळायला सुरुवात केली होती."
सिक्कीम ते दिल्ली असा प्रवास
"सिक्कीममध्ये क्रिकेटसाठी चांगल्या सुविधा आणि अकॅडमी नव्हत्या, म्हणून मी दिल्ली आणि गुडगावला जाऊन सामने खेळले. तिथेच मला खरी ओळख मिळाली आणि माझ्या खेळात सुधारणा झाली. जेव्हा मी U-19 मध्ये यूपी (UP) विरुद्ध खेळत होतो, तो माझा फक्त दुसराच सामना होता. धावसंख्या कमी होती पण मी चांगली खेळी केली. तेव्हाच सर्वांना वाटले होते की मी भविष्यात काहीतरी मोठे करीन."
"दबाव नाही, ही तर संधी आहे"आपल्या खेळाबाबत बोलताना मुकुल म्हणाला, "देवाने मला हे व्यासपीठ दिले आहे. मैदानावर दबाव असतोच, पण मी त्याकडे स्वतःला सिद्ध करण्याची आणि स्वतःचे नाव कमावण्याची एक संधी म्हणून पाहतो. माझे लक्ष्य फक्त शेवटपर्यंत टिकून राहून मॅच संपवणे हेच होते."
मुकुलला सिक्स मारायला आवडते"मला सुरुवातीपासूनच जमिनीवरून शॉट खेळण्यापेक्षा चेंडू बाऊंड्रीबाहेर सिक्स टोलवायला जास्त आवडते. गेल्या दोन मॅच मला एकही सिक्स मारता आला नव्हता, त्यामुळे आज जेव्हा पहिला सिक्स बसला तेव्हा खूप समाधान मिळाले. मला माहिती होते की एखादा बॉल माझ्या टप्प्यात येईलच आणि मी फक्त त्याच संधीची वाट पाहत होतो."
(नक्की वाचा: KKR vs LSG : Out की Not Out? केकेआरसोबत झाला धोका! बड्या खेळाडूबाबत थर्ड अंपायरच्या निर्णयावर मोठा वाद)
मुकुल चौधरीची दमदार खेळी
एलएसजीचा बॅटर मुकुल चौधरीने हाफ सेन्चुरी झळकावून मॅचचे चित्र पालटले. 182 रॅन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना लखनौला मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 4.1 षटकांत 41 रन्स केले. पण वैभव अरोराने सलग धक्के देत दोघांनाही बाद केले. कर्णधार ऋषभ पंत (10) आणि निकोलस पूरन (13) विशेष काही करू शकले नाहीत.
दुसरीकडे आयुष बदोनीने एक बाजू लावून धरली होती, त्याने 34 चेंडूत 54 धावा केल्या. पण अखेरच्या ओव्हरमध्ये 21 वर्षीय मुकुल चौधरीने तुफानी बॅटिंग करत लखनौला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज असताना वैभव अरोराच्या गोलंदाजीवर मुकुलने 2 सिक्स मारून केकेआरच्या आशेवर पाणी फेरले. केकेआरकडून वैभव अरोरा आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.