CSK vs RR Match Update : आयपीएल 2026 चा तिसरा सामना गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या राजस्थानच्या संघाने सीएसकेची पुरती दाणादाण उडवली. पहिल्या पॉवर प्ले मध्येच चेन्नईच्या धुरंधर फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतरही राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून चेन्नईच्या फलंदाजांची दांडी गुल केली. पण जेमी ओव्हरटर्नने 36 चेंडूत 43 धावांची जबरदस्त खेळी करून चन्नईला 127 धावांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे राजस्थानसमोर 20 षटकांमध्ये 128 धावांचं आव्हान होतं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या वैभव सूर्यवंशीने 17 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. राजस्थानने 12.8 षटकात 2 विकेट्स गमावून 128 धावा करत विजयी सलामी दिली. राजस्थानने आयपीएलमधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई विरोधात दमदार विजय मिळवला.
राजस्थानसाठी सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (52), ध्रुव जुरेल (18), यशस्वी जैस्वाल नाबाद (38), रियान परागने नाबाद 14 धावा केल्या. तर चेन्नई सुपर किंग्जसाठी संजू सॅमसनने(6),ऋतुराज गायकवाड (6),आयुष म्हात्रे (0) धावांवर बाद झाल्याने चेन्नईच्या धावसंख्येला ब्रेक लागला.