IPL 2026, CSK vs RR : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीमपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची या स्पर्धेतील सुरुवात धक्कादायक झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पाच वेळा चॅम्पियन्शप पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सनं या स्पर्धेत विजयी सलामी दिली.त्यानंतर पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सही या स्पर्धेत चांगली सुरुवात करेल अशी आशा त्यांच्या लाखो फॅन्सना होती. पण, पहिल्या मॅचच्या पॉवर प्लेमध्ये तरी त्यांची प्रचंड निराशा झाली आहे.
वर्ष बदलले, टीम बदलली हाल कायम!
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सची पहिली लढत राजस्थान रॉयल्सबरोबर आहे. या मॅचमध्ये राजस्थानचा कॅप्टन रियान परागनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या सिझनमध्ये तळाशी राहिलेल्या सीएसकेनं या सिझनपूर्वी मोठे बदल केले आहेत. अनुभवी, ज्येष्ठ खेळाडूंची टीम ही पारंपारिक ओळख बदलली. नव्या खेळाडूंवर विश्वास दाखवला.
मोठा गाजावाजा करत संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून घेतलं. त्यासाठी आपला अनुभवी खेळाडू रविंद्र जडेजाला राजस्थानसोबत ट्रेड केलं. पण, सीएसकेचे हाल काही संपले नाहीत.
( नक्की वाचा : IPL 2026 RCB vs SRH : पडिक्कलची पॉवर, विराटचा क्लास! गतविजेत्या RCB नं पहिल्याच मॅचमध्ये दिला सर्वांना इशारा )
संजूची निराशा, ऋतुराजही फ्लॉप
टीम इंडियाच्या यंदाच्या T20 वर्ल्ड कप विजयात संजू सॅमसनचा मोठा वाटा होता. संजूनं भारतासाठी 'करो वा मरो' परिस्थिती असलेल्या शेवटच्या तीन सामन्यात सहजसुंदर खेळ करत सर्वात जास्त रन्स केले.वर्ल्ड कपचा हिरो सीएसकेसाठी दमदार सुरुवात करेल अशी चेन्नईच्या फॅन्सची अपेक्षा होती. पण, त्यांची सपशेल निराशा झाली.
संजूला त्याची जुनी टीम असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध दोन अंकी रनही करता आले नाहीत. तो फक्त 6 रन काढून आऊट झाला. तर कॅप्टन ऋतुराजही 6 रन काढूनच आऊट झाला. ऋतुराज दुखापतीमुळे मागील सिझन पूर्ण खेळू शकला नव्हता. या सिझनमध्ये तो पूर्ण तयारीनं उतरला होता. पण चेन्नईच्या कॅप्टननं पहिल्या मॅचमध्ये निराशा केली.
Nandre Burger removed Sanju Samson.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2026
Jofra Archer cleans up Ruturaj Gaikwad. pic.twitter.com/mhV5D0yqXH
भारताचा अंडर 19 वर्ल्ड कप विजेता कॅप्टन आयुष म्हात्रे हा चेन्नईचा भावी स्टार मानला जातो. त्यानं मागील सिझनमध्ये आश्वासक कामगिरी केली होती. पण, त्याला पहिल्या मॅचमध्ये प्रभाव पाडण्यात अपयश आलं. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या आयुषला भोपळाही फोडता आला नाही. तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला.
मॅथ्यू शॉर्टची इनिंगही शॉर्टच ठरली. तो फक्त 2 रन करु शकला. तर टॉप ऑर्डरच्या पडझडीमुळे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या मुंबईकर सर्फराजनं सुरुवात चांगली केली. पण तो देखील फक्त 17 रन काढून आऊट झाला.
सीएसके पुढं प्रश्नच प्रश्न
T20 क्रिकेटमध्ये इनिंगमधील पहिले 6 ओव्हर्स हा 'पॉवर प्ले' साठी राखीव असतो. या काळात फिल्डिंगमधील मर्यांदाचा फायदा घेत जास्तीत जास्त रन्स करणे हे प्रत्येक टीमचं धोरण असतं. सीएसकेला मागील सिझनमध्ये यात सातत्यानं अपयश येत होतं.
हे अपयश पुसण्यासाठीच सीएसकेनं यंदा बरेच बदल केले. संजू सॅमसन-ऋतुराज गायकवाड-आयुष म्हात्रे ही नव्या दमाची टॉप ऑर्डर उतरवली. पण, टीमच्या परिस्थितीत फरक पडला नाही. पहिल्या 6 ओव्हर्समध्ये सीएसकेचे 4 आऊट 41 रन्स झाले होते.
धोनीची उडणार झोप
आयपीएल विजतेद जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या टीमसाठी ही सुरुवात चांगली नाही. आयपीएलचा सिझन बराच मोठा असतो. प्रत्येक टीम 14 मॅच खेळतात. त्यामुळे पहिल्या मॅचमधील पराभव हा टीमच्या वाटचालीत निर्णायक ठरत नाही. पण, पहिल्याच मॅचमध्ये सीएसकेच्या मर्यादा राजस्थान रॉयल्सनं उघड केल्या आहेत.
महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे हा सामना खेळत नसला तरी त्यानं हे सर्व नक्कीच पाहिलं असेल. तरुण सहकाऱ्यांचा हा खेळ पाहून धोनीची झोप नक्कीच उडालेली असेल हे नक्की. सीएसकेचा आणि आयपीएलचा निरोप घेण्यापूर्वी थाला धोनीला बरंच काम करावं लागणार आहे.