Arjun Tendulkar: बाप तो बापचं! पहिल्याच सामन्यात लेकानं मैदान गाजवलं, सचिनची पोस्ट चर्चेत, पण...

सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर यांला अखेर आयपीएल 2026 मध्ये पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं त्याने सोने केले. आयपीएल 2026 च्या रंगतदार टप्प्यात पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात एक भावनिक आणि कौतुकास्पद क्षण पाहायला मिळाला. लखनौच्या ताफ्यातून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला अखेर प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. लखनौकडून गोलंदाजी करताना अर्जुनने 4 षटकांत 36 धावा देत 1 महत्त्वपूर्ण बळी घेतला. संपूर्ण संघात त्याची इकॉनॉमी (9.00) सर्वात चांगली राहिली. त्याच्या या कामगिरीनंतर  सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

सचिनने लेकासाठी शेअर केलेल्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याने या पोस्टमध्ये  "अर्जुन, तुझा अभिमान वाटतो. तू संयम दाखवलास, मेहनत केलीस आणि शेवटच्या सामन्यापर्यंत संधीची वाट पाहिली. क्रिकेटमध्ये कौशल्यासोबतच संयमाची परीक्षा असते," अशा शब्दांत सचिनने लेकाचे पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला देत कौतुक केले आहे. आपल्या लाडक्या लेकाची ही कामगिरी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावूक झाला. सचिनची ही पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

Advertisement

नक्की वाचा - CM Vijay: किंग कोहलीचं 'विजय' कनेक्शन! तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना मिळालं खास गिफ्ट, पाहा क्रेझ

या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना 196-6 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, पंजाबच्या फलंदाजांनी हे आव्हान लीलया पेलले. पंजाबकडून श्रेयस अय्यरने वादळी फलंदाजी करत अवघ्या 51 चेंडूंत 101 धावांची शतकी खेळी केली. यात त्याने 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याला प्रभसिमरन सिंगच्या 69 धावांची उत्तम साथ लाभली. या दोघांमधील 76 चेंडूंतील 140 धावांची भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली आणि पंजाबने 7 गडी राखून विजय मिळवला.

नक्की वाचा - IPL 2026 : ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला! 'या' 5 खेळाडूंची CSK करणार हकालपट्टी?

आयपीएल 2026 च्या प्ले-ऑफचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. आता चौथ्या स्थानासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. राजस्थान रॉयल्सकडे अंतिम 4 मध्ये पोहोचण्याची सर्वाधिक संधी आहे. राजस्थानचा आगामी सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध असून, हा सामना जिंकल्यास त्यांचा प्ले-ऑफमधील प्रवेश निश्चित होईल. मात्र, पराभव झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.