- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका माजी क्रिकेटपटूच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केले
- 23 जानेवारी रोजी पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
- आरोपीने महिलेला कारमध्ये बसवून फार्महाऊसवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस अहवालात नमूद आहे
क्रिकेट जगताला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. या घटनेत एका माजी क्रिकेटपटूच्या मुलाने घरा काम करणाऱ्या नोकराणीवर बलात्कार केला आहे. त्यांनी तिला आपल्या फार्महाऊसवर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी या क्रिकेटपटूच्या मुलाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सुरूवातीला या बातमी बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र ही बातमी आता समोर आली आहे.
ही घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे. इथं एका माजी क्रिकेटपटूच्या मुलाला आपल्याच घरकाम करणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 23 जानेवारी रोजी पीडित महिलेने बारकी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. 'डॉन' या वृत्तपत्राने ही बातमी प्रसारीत केली आहे.
या वृत्ता नुसार आरोपीने पीडित महिलेला तातडीने घरी येण्यास सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला सोसायटीच्या गेटवरून कारमध्ये बसवून आपल्या फार्महाऊसवर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. आरोपी हा पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि फिरकीपटूचा मुलगा असल्याचे समोर आले आहे.
'साहील' या संस्थेच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण 25 टक्क्यांनी वाढले असून, वर्षभरात 6,543 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. घरातच महिला असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. साहील संस्थेच्या आकडेवारीनुसार, 60 टक्के हिंसाचाराच्या घटना या पीडितेच्या स्वतःच्या घरात घडल्या आहेत, तर 13 टक्के घटना गुन्हेगाराच्या घरी घडल्या आहेत. या घटनांमुळे पाकिस्तानातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.