Super 8 ची विजयी सुरुवात, भारताची अफगाणिस्तानवर 47 रन्सनी मात

फलंदाजीत टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली असताना मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला.

Advertisement
Read Time: 3 mins
T
मुंबई:

टी-२० वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीतही रोहित शर्माच्या टीम इंडियाने आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. ब्रिजटाऊनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ४७ धावांनी मात केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा अफगाणिस्तानवर हा आठवा विजय होता. आतापर्यंत भारतीय संघ एकदाही अफगाणिस्तानविरुद्ध हरला नाहीये.

पहिल्यांदा फलंदाजी करताना १८१ धावांपर्यंत मजल मारलेल्या टीम इंडियाने अफगाणिस्तानला निर्धारित ओव्हर्समध्ये १३४ धावांवर रोखलं. भारताकडून फलंदाजीत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी मोलाची इनिंग खेळली.

सुपर ८ राऊंडसाठी टीम इंडियात बदल -

साखळी फेरीत कर्णधार रोहित शर्माने भारताच्या प्लेइंग ११ मध्ये बदल केला नाही. परंतु सुपर ८ फेरीत रोहित शर्माने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींग घेतली. अफगाणिस्तानविरुद्ध लढतीत रोहित शर्माने सिराजला विश्रांती देत कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान दिलं. या सामन्यातही भारताच्या बॅटींग ऑर्डरमध्ये बदल झाले नाहीत.

भारताची निराशाजनक सुरुवात -

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फलंदाज सलामीला आले. परंतु ही जोडी या सामन्यातही कमाल दाखवू शकली नाही. फारुकीने रोहित शर्माला ८ धावांवर बाद केलं. दुसऱ्या बाजूने विराट कोहली मैदानावर जम बसवतोय असं वाटत होतं. परंतु मोठे फटके खेळण्यात त्यालाही अडचणी येत होत्या. ऋषभ पंतने आपल्या नेहमीच्या शैलीत काही सुरेख फटके खेळत विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. अखेरीस राशिद खानने पंतला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

Advertisement

यानंतर विराट कोहलीही फारकाळ मैदानात तग धरु शकला नाही. राशिद खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो मोहम्मद नबीकडे कॅच देऊन बाद झाला. त्याने २४ धावा केल्या. ३ बाद ६२ अशा बिकट अवस्थेत टीम इंडिया यादरम्यान सापडली होती.

सूर्यकुमार ठरला टीम इंडियासाठी तारणहार -

संघ संकटात सापडलेला असताना सूर्यकुमार यादवने भारताला सावरलं. शिवम दुबेच्या साथीने त्याने चौथ्या विकेटसाठी २९ धावांची छोटेखानी भागीदारी करत आपल्या संघाचं आव्हान कायम राखलं. शिवम दुबे या सामन्यातही आपला प्रभाव पाडू शकला नाही. राशिद खानने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं.

Advertisement

हार्दिकची सूर्याला मोलाची साथ -

अखेरीस हार्दिक पांड्याच्या साथीने सूर्यकुमार यादवने भारताचा डाव पुन्हा एकदा सावरला. दोघांनीही सुरेख फटकेबाजी करत पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. आपलं अर्धशतक झळकावत सूर्यकुमार २८ बॉलमध्ये ५ चौकार आणि ३ षटकार लगावत ५३ धावा काढून बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्याही लगेचच ३२ धावांवर बाद झाला.

यानंतर अखेरच्या फळीतल्या भारतीय खेळाडूंनी चांगला प्रतिकार करत संघाला निर्धारित ओव्हर्समध्ये ८ विकेटच्या मोबदल्यात १८१ धावांपर्यंतचा टप्पा गाठून दिला. अफगाणिस्तानकडून राशिद खान, फझलहक फारुकीने प्रत्येकी ३-३ तर नवीन उल-हकने १ विकेट घेतली.

Advertisement

अफगाणिस्तानची अडखळती सुरुवात -

१८२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात बुमराहने रेहमानउल्ला गुरबाझला माघारी धाडलं. काही क्षणातच अफगाणिस्तानची अवस्था ३ बाद २३ अशी बिकट झाली होती.

मधल्या फळीचा प्रतिकार -

संघ संकटात सापडलेला असताना अफगाणिस्तानच्या मधल्या फळीने भारताला झुंजवलं. गुलबदीन नैब, अझमतउल्ला ओमराझी, नजीबउल्ला झरदान आणि मोहम्मद नबी यांनी छोटेखानी इनिंग खेळत भारताला झुंजवलं. परंतु भारतीय माऱ्यासमोर त्यांचा हा प्रतिकार फारकाळ टिकू शकला नाही. सरतेशेवटी अफगाणिस्तानचा संघ १३४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून बुमराह आणि अर्शदीपने प्रत्येकी ३-३, कुलदीप यादवने २ तर अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजाने १-१ विकेट घेतली.