आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानवरच्या वर्चस्वाचा आपला सिलसिला कायम राखला आहे. २०२१ साली दुबईत खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपचा अपवाद वगळता आतापर्यंत आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानवर वरचढ राहिला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कमालीचा मारा करत पाकिस्तानवर ६ धावांनी मात केली. पाकिस्तानला विजयासाठी १२० धावांचं माफक आव्हान मिळालं होतं. परंतु न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर धावा काढणं पाकिस्तानला जमलं नाही.
सुरुवातीलाच पावसाने केला खेळखंडोबा -
संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याची चातकासारखे वाट पाहत असताना पावसाने अनेकांचा हिरमोड केला. पावसाची संततधार सुरु झाल्यामुळे नाणेफेकीला विलंब झाला. यानंतर पावसाने उसंत घेतल्यानंतर नाणेफेक झाली. ज्यात बाबर आझमने बाजी मारत बॉलिंगचा निर्णय घेतला. ज्यानंतर रोहित आणि विराट ही जोडी सलामीला फलंदाजीला आली. एका षटकात एकही विकेट न गमावता ८ धावा काढल्यानंतर सामन्यात पुन्हा पावसाचं आगमन झालं, ज्यामुळे सामना थांबवण्यात आला.
यानंतरही पावसाचा खेळ सुरुच राहिल्यामुळे मैदान व खेळपट्टी खेळण्याजोगी नव्हती. ज्यामुळे सामना सुरु होण्यास अधिकच विलंब झाला. षटकं कमी करावी लागतील की काय असं वाटत असतानाच हवमानाने आनंदाची बातमी दिली. पावसाने उसंत घेतल्यानंतर मैदान खेळण्याजोगं झाल्यानंतर सामना एकही षटक कमी न करता सुरु करण्यात आला.
विराट-रोहित अपयशी, ऋषभ-अक्षरने सावरला भारताचा डाव -
सामन्याला सुरुवात झाल्यानंतर भारताला ठराविक अंतराने दोन धक्के देण्यात पाकिस्तान यशस्वी ठरला. नसीम शहाने विराट कोहलीला तर शाहीन शाह आफ्रिदीने रोहित शर्माला बाद केलं. विराट या सामन्यातही अपयशी ठरला. दुसरीकडे रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये वाटत असतानाच फटकेबाजीच्या नादात त्याने आपली विकेट फेकली.
अखेरीस ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या डावखुऱ्या जोडगोळीने भारताला सावरलं. दोघांनीही संघाची पडझड रोखत तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. पावसानंतर न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर बॉल बॅटवर येत नसातानीह या जोडीने आश्वासक खेळ केला. अखेरीस नसीम शहाने अक्षर पटेलला बाद करत ही जोडी फोडली. अक्षरने २० धावा केल्या.
भारतीय डावाला घसरगुंडी -
अक्षर पटेल माघारी परतल्यानंतर भारतीय डावाला घसरगुंडी लागली. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा हे सर्व अनुभवी फलंदाज स्वस्तात बाद झाले. एक बाजू लावून उभ्या असलेल्या ऋषभ पंतच्या ४२ धावा आणि त्याला अखेरच्या फळीत अर्शदीपने दिलेली साथ या जोरावर भारताने १९ षटकात ११९ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून नसीम शहा आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. त्याला मोहम्मद अमीरने २ तर शाहीन शाह आफ्रिदीने १ विकेट घेत चांगली साथ दिली.
पाकिस्तानची सावध पण आश्वासक सुरुवात -
१२० धावांचं छोटं आव्हान पार करताना पाकिस्तानने सुरुवातीला संथ पण आश्वासक सुरुवात केली. बुमराच्या गोलंदाजीवर मिळालेल्या जिवदानाचा फायदा घेत भारतीय बाबर आझमने रिझवानच्या जोडीने संघाला पहिल्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी करुन दिली. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच बुमराहने बाबर आझमला बाद केलं.
यानंतर उस्मान खान आणि मोहम्मद रिझवान यांच्यातही दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. ही जोडी मैदानावर जम बसवू पाहतेय असं वाटत असतानाच अक्षर पटेलने उस्मान खानला माघारी धाडलं.
भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा -
फलंदाजीत भारतीय संघ कमी पडला असला तरीही गोलंदाजांनी आज आपला सर्व अनुभव पणाला लावला. टिच्चून मारा करत पाकिस्तानी फलंदाजांना १-१ धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. अनुभवी फखार झमान आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी आणखी एक महत्वाची भागीदारी झाली. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १६ धावा जोडल्यानंतर हार्दिक पांड्याने फखार झमानला माघारी धाडलं. परंतु दुसऱ्या बाजूला मोहम्मद रिझवान एक बाजू लावून उभा असल्यामुळे भारताचं टेन्शन कमी झालं नव्हतं.
१५ व्या षटकाच्या सुरुवातीलाच बुमराहने आपल्या भन्नाट इनस्विंगरवर रिझवानला बाद केलं आणि सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकलं. रिझवानने ४४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत ३१ धावा केल्या. यानंतर पाकिस्तानी गोलंदाज दडपणातून सावरुच शकले नाहीत. अखेरच्या फळीतील फलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष केला खरा...परंतु त्यांचा हा प्रयत्न ६ धावांनी कमीच पडला. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३ विकेट घेतल्या. त्याला हार्दिक पांड्याने २ तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १-१ विकेट घेत चांगली साथ दिली.