- अभिषेक शर्मा पोटाच्या विकारामुळे सावरत असून तो पूर्णपणे फिट नाही
- अभिषेकने गंभीर संसर्गामुळे वजन कमी झालं असून त्याचा स्टॅमिना कमी झाला आहे
- नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक प्रकृतीच्या कारणाने खेळला नाही
T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी सलामीवीर अभिषेक शर्माच्या फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोटाच्या विकारातून सावरत असलेला अभिषेक नुकताच वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या व्लॉगमध्ये दिसला. गुरुवारी नामिबिया विरुद्धच्या सामन्यात त्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती देण्यात आली होती. व्हिडिओमध्ये त्याने आपल्या रिकवरीबद्दल भाष्य केले असून तो अद्याप पूर्णपणे फिट नसल्याचे जाणवत आहे. टी 20 मधला सर्वात स्फोटक बॅट्समन म्हणून अभिषेक शर्माकडे पाहीले जाते.
अर्शदीपने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अभिषेकने सांगितले की, सध्या तो अत्यंत कडक डाएट पाळत आहे. "मी सध्या फक्त वरण-भात खात आहे," असे त्याने नमूद केले. गंभीर संसर्गामुळे रुग्णालयात दाखल असताना त्याचे 2 किलो वजन कमी झाले आहे. ॲक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि डिहायड्रेशनमुळे त्याच्या स्टॅमिनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे तो सध्या लवकर फिट होण्यावर भर देत आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे की, अभिषेक अजून पूर्णपणे सावरलेला नाही आणि तो कदाचित आगामी 1-2 सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. शुक्रवारी त्याने सराव केला असला तरी, टीम मॅनेजमेंट कोणताही धोका पत्करायला तयार नाही. जर अभिषेक फिट नसेल,तर इशान किशन आणि संजू सॅमसन सलामीला दिसू शकतात. नामिबिया विरुद्धच्या सामन्यात ही अभिषेक शर्मा प्रकृतीच्या कारणाने खेळू शकला नाही. त्याच्या ऐवजी संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती.
अभिषेकने व्हिडिओत सांगितले की, आजारपणामुळे त्याचा स्टॅमिना कमी झाला आहे. "मी रिकव्हरी मोडवर आहे, पण वजन कमी झाल्याने थोडा अशक्तपणा जाणवतोय," असे त्याने स्पष्ट केले. संघ व्यवस्थापन सध्या त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. प्रशिक्षक आणि फिजिओंच्या सल्ल्यानंतरच त्याला अंतिम 11 मध्ये स्थान द्यायचे की नाही, हे ठरवले जाईल. जर अभिषेक सामना खेळण्यासाठी 100 टक्के तंदुरुस्त नसेल, तर भारतीय संघ इशान किशन आणि संजू सॅमसन या जोडीसह मैदानात उतरू शकतो.