Italy vs Nepal T20 World Cup 2026: फुटबॉलच्या मैदानात ज्यांचा दबदबा आहे, असा इटली हा देश क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये खेळतोय, हेच मुळात अनेकांसाठी आश्चर्याचे होते. पण केवळ खेळायला आलोय असं नाही, तर आम्ही जिंकण्यासाठी आलोय हे इटलीने सिद्ध केलं आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये इटलीने नेपाळचा 10 विकेट्सने धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इटलीने दाखवलेला खेळ एखाद्या सरावलेल्या प्रोफेशनल टीमसारखा होता. आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये असा विजय मिळवून इटलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एका बाजूला नेपाळने इंग्लंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात अवघ्या 4 रन्सनी पराभव पत्करला होता, त्यामुळे त्यांचे पारडे जड वाटत होते. मात्र, इटलीच्या भेदक गोलंदाजीसमोर नेपाळचा डाव पत्त्यासारखा कोसळला. टॉस जिंकून इटलीने फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. बेन मनेन्टी, जेजे स्मट्स आणि क्रिशन कालुगामगे यांच्या अचूक माऱ्यामुळे नेपाळची संपूर्ण टीम अवघ्या 123 रन्सवर ऑल आऊट झाली. नेपाळला या आव्हानात्मक खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि ते इटलीच्या जाळ्यात अडकले.
( नक्की वाचा : SA vs AFG : 6,6,6...अफगाणिस्तान शेवटपर्यंत लढलं, पण 2 चुकांमुळे झाला घात! डबल सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल )
मोस्का ब्रदर्सची तुफानी बॅटिंग
124 रन्सचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इटलीच्या ओपनर्सनी नेपाळच्या बॉलर्सना डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. मोस्का बंधूंनी मैदानावर चौफेर फटकेबाजी करत हा सामना एकतर्फी केला.
अँथनी मोस्का याने अवघ्या 32 बॉल्समध्ये नाबाद 62 रन्सची झंझावाती इनिंग खेळली. त्याला त्याचा धाकटा भाऊ जस्टिन मोस्का याने मोलाची साथ दिली. जस्टिनने 44 बॉल्समध्ये नाबाद 60 रन्स केले. या दोघांच्या भागीदारीमुळे इटलीने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य सहज पार केले आणि क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
( नक्की वाचा : T20 World Cup: बॅट की जादू? टीम इंडियाबाबत श्रीलंकन खेळाडूची वेगळीच शंका, क्रिकेट विश्वात खळबळ )
पिझ्झा मेकर ते वर्ल्ड कपचा हिरो
इटलीच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे स्पिनर क्रिशन कालुगामगे. त्याने 4 ओव्हर्समध्ये केवळ 18 रन्स देऊन नेपाळच्या 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले. पण क्रिशनचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
मूळचा श्रीलंका असलेला क्रिशन वयाच्या 15 व्या वर्षी इटलीतील टस्कनी येथे स्थायिक झाला. इटलीच्या 15 जणांच्या टीममध्ये तो स्थानिक क्लबमधून आलेला महत्त्वाचा खेळाडू आहे.
क्रिशनला क्रिकेटची आवड होती, पण इटलीत क्रिकेट खेळून पोट भरणं कठीण होतं. तो उदरनिर्वाहासाठी पिझ्झा बनवण्याचे काम करायचा. पण क्रिकेटच्या प्रेमापोटी त्याला अनेकदा आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या.
रविवार हा पिझ्झा शॉपमध्ये सर्वात जास्त गर्दीचा दिवस असायचा आणि त्याच दिवशी क्रिशनचे मॅचेस असायचे. क्रिकेट खेळायला जायचे म्हणून मालक त्याला कामावरून काढून टाकायचे. आज त्याच क्रिशननं मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर जगासमोर स्वत:ची चमक दाखवली. अनेक वर्षांचा संघर्ष आणि त्यागानंतर क्रिशनने मिळवलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world