वेस्ट इंडिज येथे सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी सुपर ८ फेरीतही अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु आहे. सुपर ८ फेरीत पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात केल्यानंतर रोहित शर्माच्या भारतीय संघाने बांगलादेशवर ५० धावांनी मात केली आहे. या विजयासह टीम इंडिया उपांत्य फेरीच्या अगदी जवळ पोहचली आहे. या फेरीत भारताचा अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. नाबाद अर्धशतक आणि १ विकेट अशी कामगिरी करत हार्दिक पांड्याने आपलं महत्व या सामन्यात सिद्ध केलं.
बांगलादेशची पहिल्यांदा गोलंदाजी -
नाणेफेक जिंकून बांगलादेशने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही आश्वासक सुरुवात केली. आक्रमक फटके खेळत दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. परंतु रोहित शर्मा शाकीब अल हसनच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि पंत यांनी महत्वाची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनीही ३२ धावांची भागीदारी केली. पंतने यादरम्यान आपल्या नेहमीच्या शैलीत आक्रमक फटके खेळले. पहिल्या सामन्यापासून चाचपडणारा विराट या सामन्यात आपल्या लयीत दिसत असतानाच तंझीम हसन साकीबने त्याची दांडी गुल केली. विराटने २८ बॉलमध्ये १ चौकार आणि ३ षटकार लगावत ३७ धावा केल्या. या धक्क्यातून भारत सावरतो न सावरतो तोच सूर्यकुमार यादवही तंझीमच्या गोलंदाजीवर बाद झाला.
हार्दिक-शिवम दुबेमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत -
यानंतर ऋषभ पंतने शिवम दुबेच्या साथीने भारतीय संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. परंतु फटकेबाजीच्या नादात तो देखील राशिद हुसैनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३६ धावा केल्या.
परंतु यानंतर हार्दिक पांड्याने शिवम दुबेच्या साथीने बांगलादेशी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. दोघांनीही केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने निर्धारित षटकांत ५ विकेट गमावत १९६ धावांपर्यंत मजल मारली. शिवम दुबे ३४ धावा काढून बाद झाला. हार्दिक पांड्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार लगावत नाबाद ५० धावा केल्या. बांगलादेशकडून राशिद हुसैन, तंझीम हसन साकीबने प्रत्येकी २-२ तर शाकीब अल हसनने १ विकेट घेतली.
अवश्य वाचा - 'सीनियर खेळाडूंसोबत तू...' BCCI नं गौतम गंभीरला विचारले 3 मोठे प्रश्न
बांगलादेशचीही सावध पण आश्वासक सुरुवात -
लिटन दास आणि तंझीद हसन यांनी बांगलादेशला सावध सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ३५ धावा जोडल्या. ही जोडी मैदानावर टिकतेय असं वाटत असतानाच हार्दिक पांड्याने लिटन दासला माघारी धाडलं. यानंतर तंझीदने कर्णधार शांटोच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी करत बांगलादेशचा लढा सुरु ठेवला. ही जोडी देखील मैदानात टिकतेय असं वाटत असतानाच कुलदीप यादवने तंझीदला आपल्या जाळ्यात अडकवलं.
बांगलादेशच्या डावाला गळती, टीम इंडिया वरचढ -
यानंतर बांगलादेशचा संघ सामन्यात बॅकफूटवर फेकला गेला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे ठराविक अंतराने एक-एक करत बांगलादेशी फलंदाज माघारी परतत राहिले. बांगलादेशकडून कर्णधार शांटोने ४० धावा आणि अखेरच्या फळीत रिशाद हुसैनने २४ धावा करत एकाकी झुंज दिली. सरतेशेवटी बांगलादेश निर्धारित षटकांत ८ विकेट गमावत १४६ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून कुलदीप यादवने ३ विकेट घेतल्या. त्याला अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराहने प्रत्येकी २-२ तर हार्दिक पांड्याने १ विकेट घेत चांगली साथ दिली.