Vaibhav Suryavanshi Record, Ind U19 vs Aus U19: आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करून भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा भारताचा तरुण क्रिकेटर वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा धमाका केलाय. 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने यूथ वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. बिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या अंडर 19 टीममध्ये दूसरा वनडे सामना रंगला. वैभवने या सामन्यात अप्रतिम फलंदाजी करून 68 चेंडूत 70 धावांची खेळी केली. तसच 5 चौकारांसह 6 षटकार ठोकून वैभवने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. वैभवने अशी चमकदार कामगिरी करत एका मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. वैभव आता यूथ वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यात वैभवने 102.94 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. त्याने फक्त 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
यूथ वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज
- 41*- वैभव सूर्यवंशी (10 सामने)
- 38 - उन्मुक्त चंद (21 सामने)
- 35 - जवाद अबरार (22 सामने)
- 31 - शाहजेब खान (24 सामने)
- 30 - यशस्वी जैस्वाल (27 सामने)
- 30 - तौहीद हृदयोय (45 सामने)
ब्रिस्बेनमध्ये रंगलेल्या दुसऱ्या यूथ वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. वैभवने मैदानात उतरताच आक्रमक फटकेबाजी सुरु केली. त्याने प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौकार-षटाकारांचा पाऊस पाडला.
दुसऱ्या यूथ वनडेत भारताच्या अंडर 19 संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 50 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 209 धावांपर्यंत मजल मारली. वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्राने 70 धावांची खेळी केली.दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी एकूण 117 धावांची भागिदारी केली. दोघांनीही फक्त 18.3 षटकात 117 धावा कुटल्या. वेदांत त्रिवेदीने या सामन्यात 26 धावांची खेळी केली. वैभवने पहिल्या सामन्यात 22 चेंडूत 38 धावा, तर दुसऱ्या सामन्यात 68 चेंडूत 70 धावांची अर्धशतकी खेळी केली.
पहिल्या सामन्यात भारताच्या अंडर 19 संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात 14 वर्षांच्या वैभवने कमाल केली. याआधी इंग्लंड दौऱ्यावर यूथ वनडे सीरिजमध्येही वैभवने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने 5 इनिंगमध्ये एकूण 355 धावा केल्या होत्या. यामध्ये 143 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या होती.