मुंबईकरांसाठी खास नातं असलेलं वानखेडे स्टेडियम 50 वर्षांचं झालं आहे. जागतिक क्रिकेटचं पॉवर हाऊस असलेल्या वानखेडे स्टेडियमने मुंबई क्रिकेटला नवी ओळख दिली. 1975 साली हे स्टेडियम सुरु झालं. गेल्या पाच दशकात या स्टेडियमनं (wankhede stadium) क्रिकेट फॅन्सना अनेक कटू-गोड आठवणी दिल्या आहेत.
ही घटना आहे 2012ची. आयपीएलचा पाचवा सीजन होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या एका मॅचमध्ये कोलकत्ता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सला हरवलं होतं. सामन्यानंतर शाहरूख खान आपली लेक सुहाना खानसोबत मैदानावर आले होते. मात्र मधे सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाण्यापासून रोखलं. अशात किंग खान सुरक्षा रक्षकाशीही भिडले आणि धक्काबुक्की करू लागले. या घटनेनंतर एमसीएने शाहरूख खानवर पाच वर्षांसाठी वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशास बंदी आणली होती.
नक्की वाचा - Wankhede@50: ...नंतर पाकिस्तान मुंबईत कधीच खेळलं नाही, 1991 साली वानखेडेवर काय घडलं?
IPL चे चेअरमन आणि बीसीसीआयचे उपाध्यश्र राजीव शुक्ला शाहरुखच्या बचावासाठी पुढे आले होते. मात्र शेवटचा निर्णय बीसीसीआयचा असेल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र एमसीएने सांगितलं की, ते आपल्या निर्णयापासून मागे हटणार नाही. अशात शाहरुख खान एमसीए आणि बीसीसीआयच्या विरोधात उतरले होते. मात्र चार वर्षांनंतर त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली होती. शाहरुख खानने काही वर्षांनंतर न्यायालयात या प्रकरणात आपली भूमिका मांडली होती. शाहरूख म्हणाला होता की, यातील एका सुरक्षा रक्षकाने त्यांना धर्मावरुन टिप्पणी केली होती. ज्यानंतर त्याला राग आला होता. त्यातून मी धक्काबुक्की केल्याचं तो यावेळी म्हणाला होता.
कशी झाली वानखेडेची निर्मिती?
1970 च्या दशकात शेषराव वानखेडे हे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. ते 1972 साली विधानसभेचे अध्यक्ष होते. वानखेडे यांना क्रिकेट प्रशासनाचाही अनुभव होता. ते बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष (BCA) होते. त्यावेळी मुंबईत ब्रेबॉर्न हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होतं. त्याची मालकी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडं (सीसीए) होती. बीसीए आणि सीसीए प्रशासनामध्ये सख्य नव्हतं. त्यांचे वारंवार खटके उडत असत.
( नक्की वाचा : सचिन तेंडुलकरच्या 51 अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? )
विधानसभेतील काही तरुण आमदारांनी एका क्रिकेट सामन्यांचा प्रस्ताव वानखेडे यांच्याकडं ठेवला. त्यांना तो प्रस्ताव आवडला. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हा सामना व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी वानखेडेंच्या नेतृत्त्वाखालील आमदारांच्या शिष्टमंडळानं सीसीएचे तत्कालीन अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची भेट घेतली.
विजय मर्चंट यांनी वानखेडे यांची मागणी फेटाळली. त्या बैठकीत जोरदार वाद झाला. त्यावेळी तुम्ही या पद्धतीनं अरेरावी केली तर बीसीएला नवं स्टेडियम बांधावं लागेल, असं वानखेडे यांनी सुनावलं. त्यावर तुम्ही घाटी लोक कधीही असं करू शकणार नाही, असं कुत्सित उत्तर विजय मर्चंट यांनी दिलं.