Akola News : बहुचर्चित हुंडीवाले हत्याकांडाचा 7 वर्षांनी निकाल; 10 आरोपींना जन्मठेप

अकोल्यातली बहुचर्चित गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले यांच्या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात आज न्यायालयाने निकाल दिला.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला 

Akola News : अकोल्यातली बहुचर्चित गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले यांच्या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात आज न्यायालयाने निकाल दिला. ६ मे २०१९ रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी किशनराव हुंडीवाले हे धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते. दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेमुळे केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तब्बल १५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास, चार्जशीट आणि न्यायालयीन सुनावणी

या खून प्रकरणाचा तपास सुरुवातीला तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केला. पुढे बालापूर येथील सोहेल शेख, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील तसेच पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान हत्येशी संबंधित साक्षी, तांत्रिक पुरावे आणि विविध कागदपत्रांच्या आधारे एक हजारांहून अधिक कागदपत्रांची सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान काही आरोपींच्या सहभागाबाबत ठोस आणि विश्वासार्ह पुरावे नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अशा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.

नक्की वाचा - Akola News : अकोल्यात भाजप उमेदवाराला MIM–काँग्रेसचा पाठिंबा? छुप्या युतीची पुन्हा जोरदार चर्चा

१० दोषींना जन्मठेप, ५ आरोपी निर्दोष

आज झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने या बहुचर्चित हत्याकांडात महत्त्वपूर्ण निकाल दिला. श्रीराम गावंडे यांच्यासह रणजीत गावंडे, विक्रम गावंडे, सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहीर आणि दिनेश राजपूत या दहा आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दिपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या निकालामुळे हुंडीवाले कुटुंबीयांसह गवळी समाजात समाधान व्यक्त केले जात असून न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. यावर आता मुंबई न्यायालयाच्या खंडपीठ नागपूर येथे आरोपी पक्षाकडून निर्णयाच्या विरोधात अपील करणार असल्याची माहिती समोर आली.

Advertisement
Topics mentioned in this article