सूरज कसबे, प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील महिंद्रा अँथिया या सोसायटीमधील भटक्या श्वानांवर विषप्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तीन श्वानांचा मृत्यू झाला आहे. औंध येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात या श्वानांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता 325 आणि प्राणी क्रूरता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या सोसायटीमध्ये भटक्या श्वानांना खायला घालण्यावरुन दोन गटात वाद होते. शनिवारी रात्री उशिरा या सोसायटीमधील श्वानांना खायला घालताना विषप्रयोग करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. प्राणीहक्क कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सोसायटी परिसरात 40 भटके श्वान आहेत. त्यातील 12 श्वानांना खायला घालण्यात आले होते. त्यातील 3 श्वानांचा मृत्यू झाला असून उर्वरित श्वानांची प्रकृती गंभीर आहे.
नक्की वाचा - Sinner News : सिन्नर तिहेरी जळीतकांडात आणखी एकाचा मृत्यू, उपचारादरम्यान सासुनेही सोडला जीव
या श्वानांना उलटी, जुलाब व शुद्ध हरपणे आदी लक्षणे दिसू लागल्याने त्यांना पशू वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या निरुपद्रवी प्राण्यांचा ठार मारण्याचा पूर्व नियोजित कट रचून त्याची हत्या करण्यात आली असल्याचं प्राणी प्रेमी म्हणतायत . अनेक वर्षे या सोसायटी मध्ये वास्तव्य करणाऱ्या या श्वानाचा जीव घेतला गेलाय तर उर्वरित श्वान गंभीर आहेत.
दरम्यान विषप्रयोग झालेल्या श्वानावर तातडीने उपचार करण्यात यावेत, या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, भटक्या श्वानांना अन्न पुरवठा करणाऱ्या नागरिकांना संरक्षण देण्यात यावे, सोसायट्यांमध्ये प्राणी संरक्षण कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशी मागणीही प्राणी प्रेमींनी केली आहे.