देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune News : पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून दुपारी ४ च्या सुमारास दोघा आरोपींनी एका 21 वर्षीय मुलीच्या डोळ्यात लाल तिखट फेकून तिचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहीर हारुन शेख आणि आयन हारुन शेख अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे मुलीचे अपहरण करणारे दोघे सख्खे भाऊ आहेत.
पीडित मुलगी, तिचा भाऊ आणि आईसोबत भिगवण बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी आले होते. यावेळी आरोपींनी त्यांची गाडी अडवली. पीडित मुलीचा भाऊ आणि आई यांच्या डोळ्यात लाल तिखट फेकलं. मुलीच्या आईला मारहाण केली आणि मुलीला घेऊन पसार झाले. या संपूर्ण घटने प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणीचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली असून काही पोलीस पथके देखील शोधासाठी रवाना केली आहेत.
आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकलं...
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी ही दौंड तालुक्यातील असून तिचा काही दिवसात विवाह होणार होता. पीडित मुलगी १७ फेब्रुवारी रोजी तिची आई आणि तिच्या भावासोबत भिगवण बाजारपेठेत काही खरेदीसाठी आली होती. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार तिच्यासोबत घडला. दौंड तालुक्यातील शेख वस्तीवरील दोघा आरोपींनी संबंधित मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकलं आणि मुलीला घेऊन दोघे आरोपी फरार झाले. हा संपूर्ण प्रकार भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या नातलगाने आता भिगवण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे.