पुण्याच्या दुर्घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, अल्पवयीन बाईकस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सदर अपघात प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतलेच आहे शिवाय त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईमध्ये एका ३२ वर्षांच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला आहे. बाईकने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असून बाईकस्वार हा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील पोर्शे कार प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार घडला आहे. गुरुवारी सकाळी माझगाव भागात हा प्रकार घडला असून मयताचे नाव इरफान शेख असल्याचे कळाले आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बाईकस्वाराचे वय हे 15 वर्षे असल्याचे कळाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाईकने धडक दिल्यानंतर शेख हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला तत्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अल्पवीयन आरोपीला ताब्यात घेऊन त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.   


 

सदर अपघात प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतलेच आहे शिवाय त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी च्या कलम 304(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मोटार वाहन कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पुण्यामध्ये दोन तरुण अभियंत्यांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला होता. अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे बाईकवरून जात असताना त्यांच्या बाईकला भरधाव वेगातील पोर्शे कारने धडक दिली होती. या दुर्घटनेत अनीश आणि अश्विनी या दोघांचा मृत्यू झाला होता. पोर्शे कार चालवणारा आरोपी हा अल्पवयीन आहे. ही दुर्घटना 19  मे रोजी घडली होती आणि यातील आरोपी हा 17 वर्षांचा आहे. पीटीआयने सदर घटनेचे वृत्त दिले आहे. 

पुणे दुर्घटनेतील आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपीच्या वकिलांनी सांगितले की बाल न्याय मंडळ अल्पवीयन आरोपीविरोधात सज्ञान म्हणून खटला चालवण्यात यावा अथवा नाही याबाबतचा निर्णय घेणार आहे. अल्पवयीन आरोपीतर्फे युक्तिवाद करणाऱ्या प्रशांत पाटील यांनी म्हटले की "बाल न्याय कायद्या अंतर्गत आरोपी हा सज्ञान आहे अथना बालक आहे हे ठरवण्याची प्रक्रिया असते.  या प्रक्रियेसाठी 90  दिवस, लागू शकतात."

पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की सदर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात राहावे लागेलच असे नाही. ते पुढे म्हणाले की, पाटील म्हणाले की, बाल न्याय मंडळ नियमित अहवाल आणि तक्रारींचा आढावा घेत सदर प्रकरणावर लक्ष ठेवून असते.  सुमारे 90 दिवसांनंतर निर्णय येतो की आरोपीविरोधात अल्पवयीन म्हणून खटला चालवावा अथवा सज्ञान म्हणून.

Advertisement
Topics mentioned in this article