
तेलंगणामध्ये 'बालिका वधू'ची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील एका 13 वर्षांच्या मुलीला बालविवाहातून वाचवण्यात आले आहे. तिच्या शिक्षकाने जिल्हा बाल संरक्षण सेवा आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
आठवीत शिकणाऱ्या या मुलीचे लग्न 28 मे रोजी कंडीवाडा येथील 40 वर्षीय श्रीनिवास गौड नावाच्या व्यक्तीसोबत लावून देण्यात आले होते. ही घटना तेव्हा समोर आली, जेव्हा मुलीने तिच्या शिक्षिकेला याबद्दल सांगितले. त्यानंतर शिक्षिकेने तहसीलदार राजेश्वर आणि इन्स्पेक्टर प्रसाद यांच्याशी संपर्क साधला.
पोलीस इन्स्पेक्टरांनी याबाबत सांगितलं की, "ती मुलगी तिच्या आई आणि भावासोबत राहते. भाड्याने राहत असलेल्या घराच्या मालकाला तिच्या आईने सांगितले होते की तिला मुलीचे लग्न लावून द्यायचे आहे. एका मध्यस्थाने 40 वर्षांच्या माणसाचे स्थळ आणले आणि मे महिन्यात 'लग्न' झाले."
प्रसाद यांनी सांगितले की, "त्या व्यक्तीवर, त्याच्या पत्नीवर, मुलीच्या आईवर, मध्यस्थावर आणि हे बेकायदेशीर लग्न लावणाऱ्या पुजाऱ्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
( नक्की वाचा : 6 वर्षांची नवरी, 45 वर्षांचा नवरा! अफगाणिस्तानातील धक्कादायक प्रकार, तालिबाननं दिला अजब आदेश )
मुलीला संरक्षण
मुलीला सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी सखी केंद्रात हलवण्यात आले आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रवीण कुमार यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, ते तिचे समुपदेशन करत आहेत.
कुमार यांनी एनडीटीव्हीला सांगितले, "ते सुमारे 2 महिने एकत्र राहत होते. मुलीवर लैंगिक संबंधांसाठी दबाव आणला गेला असेल, तर त्या श्रीनिवास गौड नावाच्या व्यक्तीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल." अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवणे हे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत दंडनीय आहे.
बालविवाहाचे वाढते प्रमाण
या घटनेनंतर तेलंगणामधील बालविवाहाची समस्या अजूनही कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य सरकारने ही प्रथा थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. बाल संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षी अशा 44 घटना घडल्या आहेत आणि गेल्या वर्षी 60 घटना घडल्या होत्या. यातील मोठ्या संख्येने बेकायदेशीर विवाह हे गरिबीमुळे नसून पळून जाण्याच्या भीतीमुळे होतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या ताज्या प्रकरणानंतरही अधिकाऱ्याला आणखी एका बालविवाहाची माहिती मिळाली आहे, ज्यात 18 वर्षांची मुलगी आणि 19 वर्षांचा मुलगा यांचा 14 ऑगस्ट रोजी विवाह ठरला आहे. पुरुषांसाठी विवाहाचे वय 21 आणि महिलांसाठी 18 आहे.
ते म्हणाले, "आम्हाला अत्यंत गोपनीयता राखायची आहे. अन्यथा, ते सावध होतात आणि आम्ही त्यांना रंगेहात पकडू शकत नाही."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world