सोसायटीतील पार्किंगच्या जागेवरुन वाद, वृद्धाने स्वत:ला संपवलं; मुंबईतील धक्कादायक वास्तव 

एका क्षुल्लक कारणावरुन एका 67 वर्षांच्या वृद्धाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

मुलुंडमध्ये एका 67 वर्षांचा एलआयसी एजंट असलेल्या वृद्धाचा पार्किंगच्या वादातून (Mumbai Parking dispute) जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका गृहिणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या गृहिणीने वृद्धाला दिलेल्या मनस्तापातून आत्महत्येसारखं  टोकाचं पाऊल उचललं. वृद्धाने लोकलच्या खाली उडी मारून स्वत:चा जीव संपवला.  

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुमकुम मिश्रा (45) आणि 19 व्या मजल्यावरील कुशल दंड यांच्यामध्ये मनिष प्राईड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील पार्किंगच्या जागेवरुन वाद सुरू होता. आरोपी कुमकुम मिश्रा यांच्या पार्किंगमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यामुळे कुमकुम काही काळासाठी दंड कुटुंबाच्या पार्किंगच्या जागेचा उपयोग करीत होत्या. दंड कुटुंबाकडे कार नव्हती. त्यामुळे त्या दंड कुटुंबाची पार्किंगची जागा कायमस्वरुपी मिळावी यासाठी मागणी करीत होती. 

कुशाल दंड यांना पेसमेकर लावले होते, याशिवाय त्यांची तब्येतही नाजूक होती. 5 ऑगस्ट रोजी कुमकुम मिश्रा यांनी दंडांना लिफ्टमध्ये अडवलं आणि त्यांची पार्किंगची जागा मागितली. असं न केल्यास त्यांच्याविरोधात खोट्या लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. याशिवाय त्यांना सोसायटीतून बाहेर काढण्याची धमकी दिली. यानंतर दंड यांना अस्वस्थ वाटतं होतं, शिवाय त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं.   

नक्की वाचा - ऑफिसमधील अतिरिक्त ताणामुळे तरुणीचा मृत्यू? पुण्यातील प्रसिद्ध EY कंपनीवरील आरोपामुळे देशभरात खळबळ

शेवटी 7 ऑगस्ट रोजी दंड यांचा मृतदेह मुलुंडच्या रेल्वेट्रकवर आढळला. या घटनेनंतर दंड कुटुंबीयांनी कुमकुम मिश्रा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली. या तक्रारीत दिल्यानुसार, मिश्रा यांच्याकडून दिली जाणारी धमकी आणि अपमानास्पद वागणुकीमुळे कुशाल दंड यांनी धक्कादायक पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. मुलुंड पोलिसांनी 1 सप्टेंबर रोजी कुशाल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली कलम 108 अंतर्गत मिश्रा यांना अटक केली. गेल्या आठवड्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश वी एम सुंडाले यांनी जामिनावर त्यांची सुटका केली. 

या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी मिश्रा यांनी दंड यांच्या कुटुंबीयांकडे पार्किंगची जागा सोडण्याची मागणी केली. दंड यांच्याकडे कार नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकत होते. 5 ऑगस्ट रोजी दंड उशीरा घरी परतले, तेव्हाही मिश्रांनी त्यांना शिव्या दिल्या आणि बिल्डिंगमधून बाहेर काढण्याची धमकी दिल्याचं दंड कुटुंबीयांनी सांगितलं. 

नक्की वाचा - यूपीचा 'लखोबा लोखंडे', लग्नाचं आमिष दाखवून जवळपास न्यायाधीशासह 50 महिलांना फसवलं

हाऊसिंग सोसायटीचे निवासी भावेश पिथाडिया यांच्यासह अनेक साक्षीदारांनी मिश्रा कुटुंबाकडून कुशाल दंड यांना होणाऱ्या मनस्तापाची पुष्टी केली आहे. मिश्रा यांनी दंड यांना इमारतीच्या लिफ्टमध्ये डास मारण्याच्या बॅटने हल्ला केला होता. या वादानंतर बायपास सर्जरी आणि पेसमेकर लागलेल्या दंड यांच्या छातीत कळा सुरू झाल्या होत्या. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते रात्रभर तणावात होते. 

दुसऱ्या दिवशी 7 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता दूध आणण्यासाठी ते घराबाहेर गेले. मात्र उशीरापर्यंत ते घरी आलेच नाही. यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शेवटी साधारण साडेपाचच्या सुमारास एक रेल्वे अपघाताचं वृत्त समोर आलं, कुशाल दंड यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती. शेवटी इमारतीतील इतर निवासींनी मिळून मिश्रा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली.