7 कोटी 80 लाख कुणाचे? रात्री उशीरापर्यंत रोकड मोजण्याचं काम, पोलिसांची मोठी कारवाई

गुरूवारी रात्री उशीरापर्यंत या रोकडची संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये मोजणी सुरू होती. या रोकडीच्या मोजणीसाठी पोलिसांनी मशीन देखील मागवल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मीरा-भाईंदर वसई - विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 7 कोटी 80 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये नालासोपारा पश्चिमेच्या बस डेपो परिसरात गुन्हे शाखा 3 च्या पथकाने ATM मध्ये पैसे भरणाऱ्या व्हॅन मध्ये 3 कोटी 48 लाख रुपये जप्त केले. दुसरीकडे मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कनेर फाटा येथे  ATM व्हॅनमध्ये 2 कोटी 80 लाख रुपये आढळले. तर तिकडे मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 एटीएम व्हॅनमधून 1 कोटी 47 लाख रुपयांची रोकड अशी एकूण 7 कोटी 80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कुणाची आणि कशासाठी आणण्यात आली होती याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

विधानसभा निवडणुकीत मतदारांना अमिष देण्यासाठी बेकायदेशीरित्या काळ्या पैशांची देवाण घेवाण होत असते. त्यासाठी आचारसंहितेच्या काळात रोकड बाळगण्यावर आणि रोकडीची ने-आण करण्यासाठी विशिष्ट नियमावली आखून देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तशा सूचना पोलीस आणि भरारी पथकाला देण्यात आल्या आहेत. आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मीरा, भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नालासोपार्‍यात एटीएम व्हॅनमधून 3 कोटी 48 लाख, मांडवी पोलीस ठाणे हद्दीत एटीएम व्हॅनमधून 2 कोटी 80 लाख आणि मीरा रोडच्या नया नगरमध्ये दोन एटीएम व्हॅनमधून 1 कोटी 47 लाख रुपयांची रोकड अशी एकूण  7 कोटी 80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कुठल्याही कागदपत्रांशिवाय ही रोकड बाळगण्यात आली होती. ही रोकड जप्त करून त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Advertisement

नक्की वाचा - 15 दिवसात 12 बेरोजगार तरुण झाले 100 कोटींचे मालक, मालेगावात पैशांचा पाऊस

गुरूवारी रात्री उशीरापर्यंत या रोकडची संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये मोजणी सुरू होती. या रोकडीच्या मोजणीसाठी पोलिसांनी मशीन देखील मागवल्या होत्या. विशेष म्हणजे अशाप्रकारची रोकड बाळगण्याची अधिकृत कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तसेच बँकांच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी क्यूआर कोड दिला जातो. जेवढी रोकड एटीएम मशीन मध्ये भरायची असते तेवढ्या रकमेचा क्यूआर कोड असतो. मात्र कारवाई केलेल्या या सर्व ४ व्हॅनमध्ये मंजूर रकमेपेक्षा जास्त रोकड आढळल्यामुळे ही रोकड बेकायदेशीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच जप्त केलेल्या रोकडेची माहिती आयकर विभागाला देण्यात येणार असून त्यांच्याकडून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली आहे.

Advertisement

एटीएम व्हॅनमध्ये बेहिशोबी रोकड आढळणे संशयास्पद असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या बेहिशोबी रोकड प्रकरणी चांगलेच शाल जोडे हाणून विरोधकांवर निशाणा साधला. राजकारणा एवढा वाईट विषय कोणता राहिला नाही..ती रक्कम माझी तर नाही.. मग कोणाची असेल तुम्ही विचार करा..असे म्हणत "बँकांची गाडी मॅनेज करण्यात एवढी ताकद कुणाची आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. आमच्या (वसई) तालुक्यातील लोक सुशिक्षित - सुसंस्कृत आहेत. पैशाने विकले जाणारे लोक आपल्याकडे नाहीत. कृपया पैसे पाठवणाऱ्याने विचार करा. तुम्ही पाठवलेले पैसे अर्धे वाटतील आणि अर्धे घरात ठेवतील. त्यापेक्षा पैसे वाटू नका आणि नाही ते धंदे करू नका... मात्र माझ्या विनंतीला तुम्ही मान देणार नाहीत ...यापुढे आणखी वेगळ्या मार्गाने पैसे पाठवतील..पोलीस संरक्षणामध्ये पैसे पाठवतील..मात्र आम्ही लढायला तयार आहोत, असा टोला लगवत ठाकूर यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Advertisement