नाशिकच्या मालेगाव (Malegaon Crime News) येथील 12 बेरोजगार तरुण गेल्या 15 दिवसात मालामाल झाले आहेत. या तरुणांच्या बँक अकाऊंटमधून तब्बल शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं दिसून आलं आहे. निवडणुकीपूर्वी घडलेल्या या प्रकराने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावातील मर्चेंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ 12 खात्यांमध्ये 100 ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून ही उलाढाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून ज्यांच्या नावे हे व्यवहार होत आहेत त्यांना मात्र याबाबत काहीही कल्पना नाही. शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
मालेगावातील 12 बेरोजगार तरुणांच्या नावावर बनावट कंपन्या तयार करून कुणाच्या नावावर 10 तर कुणाच्या नावावर 15 कोटी अशा रकमेपर्यंतचे व्यवहार नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव येथील शाखेत करण्यात आले आहे. या तरुणांना मालेगाव बाजार समितीत नोकरीचे आमिष दाखवत सिराज अहमद या इसमाने तरुणांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सह्या घेत नाशिक मर्चेंट बँकेत (मालेगाव शाखा) बनावट खाती उघडली व त्या खात्यावरून गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये शेकडो कोटींचे आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे.
नक्की वाचा - पर्यटनासाठी आला, सायकलवर स्टंटबाजी केली; एक धडक अन् 16 वर्षीय मुलाचा मृत्यू
दोषींवरती कठोर कारवाईची मागणी..
हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर या 12 तरुणांनी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत न्यायाची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी पत्रकार परिषद घेत मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून हा व्यवहार कोणी केला? यामागे कोणाचा हात आहे ? याबाबत पोलिसांकडून चौकशी सूरू करण्यात आली आहे..
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 15 दिवसांत 100 कोटी रकमेची खात्यातून उलाढाल होणे आणि ज्यांच्या खात्यातून ती उलाढाल झाली त्यांना माहीतच नसणे म्हणजे यात काहीतरी गौड बंगाल आहे हे नक्की.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world