योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News :अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या हिवरखेडमध्ये निवडणुकीच्या धामधुमीमुळे सर्व पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत एका संशयिताने सात वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दत्त भारती मंदिराजवळील परिसरात हा प्रकार घडला. आरोपीने लहान मुलीला उचलून पुढील चौकाकडे नेले होते, मात्र तिथे लोक उपस्थित असल्याचे पाहून त्याने तिला खाली सोडून दिले. यामुळे परिसरात काही वेळ खळबळ निर्माण झाली होती.
पहिली घटना शांत झाल्यावर काही अंतराने आरोपीने दुसऱ्या मार्गाचा वापर करत पुन्हा त्याच मुलीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. आरोपीची ही हालचाल परिसरातील महिला आणि लहान मुलांनी तात्काळ पाहिली. त्यांनी मोठ्याने आरडाओरड सुरू केल्यामुळे उपस्थित नागरिक तातडीने सतर्क झाले. मुलीला पुन्हा नेण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून त्यांनी आरोपीचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली. महिलांच्या तत्परतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापासून वाचली, असे स्थानिकांनी सांगितले.
( नक्की वाचा : Akola News : 25 वर्षांचा संघर्ष संपला! अकोल्यातील 'या' गावात पहिली ऐतिहासिक निवडणूक, वाचा Ground Report )
महिलांच्या आरडाओरडीचा आवाज ऐकताच, परिसरातील सर्व युवकांनी एकत्र येऊन आरोपीचा शर्थीचा पाठलाग केला. अखेर स्वस्तिक कॉलनी परिसरात त्या संशयिताला पकडण्यात युवकांना यश आले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. दरम्यान, पीडित मुलीच्या पालकांनी हिवरखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळल्याची भावना सध्या हिवरखेड परिसरात व्यक्त होत आहे.