कोणत्याही व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शाळेचा मोठा वाटा असतो. लहान मुलांना शिक्षण आणि संस्कार देण्याचं काम शाळा करतात. मुलांना चांगलं-वाईट याचं शिक्षण देणाऱ्या शाळेनंच त्यांच्या विद्यार्थ्याचा बळी दिला आहे. जादूटोणाच्या नादात शाळेनं ही संतापजनक कृती केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुसरीमध्ये शिकणाऱ्या या मुलाचा शाळेनं बळी दिला आहे. या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. शाळेचे मालक जसदोहन सिंह, त्यांचा मुलगा आणि शाळेचा संचालक दिनेश बघल आणि तीन शिक्षकांना या प्रकरणात अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी, 'तुमचा मुलगा आजारी आहे, असा फोन त्यांना शाळा प्रशासनाकडून आला होता. ते शाळेत पोहोचले. त्यावेळी मुलाला संचालकांनी कारमधून हॉस्पिटलमध्ये नेलं असल्याचं शाळा अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर बघेलच्या कारमधून त्यांचा मृतदेह जप्त करण्यात आला.'
हाथरस पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरीमध्ये शिकणाऱ्या या मुलाची हत्या शाळेच्या बाहेर ट्यूबवेलवर करण्याची योजना होती. पण, मुलाला शाळेच्या बाहेर नेत असताना तो जागा झाला. त्यामुळे घाबरलेल्या 3 आरोपींनी गळा दाबून त्याची हत्या केली.' या शाळेचा संचालक जादूटोणा करत होते, असं समजतंय.
( नक्की वाचा : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीबाबत भयंकर घडलं,पुण्यातील धक्कादायक घटना )
आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, ' त्यांनी 6 सप्टेंबर रोजी एका 9 वर्षाच्या मुलाची हत्या करण्याची योजना केली होती. त्यांनी त्या मुलाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पण, मुलानं आरडाओरडा केला. त्या मुलाची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी त्याचा गळा दाबल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणाच्या तपासामध्ये शाळेबाहेरच्या विहीरीजवळ पूजेचं साहित्य आढळलं आहे. त्यामुळे हा जादूटोणाचा प्रकार असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा हेतू बळी देणं होता. बळी दिल्यानं शाळेची समृद्धी होईल, अशी आरोपींची समजूत होती. शाळेतील संचालकांनी काही कर्ज घेतलं होतं. त्यामुळे ते त्रस्त होते. त्यांनी 6 सप्टेंबरला एका मुलाच्या हत्येची योजना केली होती, पण ती अयशस्वी झाली. त्यानंतर 22 सप्टेंबरला आणखी एक योजना करत दुसरीच्या मुलाचा बळी दिला.